नागपूर : वांद्रे कुर्ला संकुलातील बुलेट ट्रेनसाठीच्या प्रस्तावित जागेवर आता मेट्रो ३ ची कारशेड हलविण्याबाबत गांभीर्याने विचार सुरू आहे. यावर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. राज्य सरकारचे सल्लागार कोण हे समजत नाही ते राज्य आणि सरकारलाही बुडवायला निघाले आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. नागपुरात ते पत्रकाराशी बोलत होते.
मेट्रो -३ ची कारशेड आता वांद्रे कुर्ला संकुल येथे बुलेट ट्रेनसाठीच्या प्रस्तावित जागेवर उभारता येते का, या पर्यायाची चाचणपी राज्य सरकारकडून करण्यात येत असल्याची चर्चा आहे. राज्य सरकारच्या या निर्णयवरून देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला धारेवर धरलं आहे.
‘बुलेट ट्रेनचं स्टेशन जमिनीच्या आत करायचं ठरवलं तर त्याचा खर्च किमान पाच ते सहा हजार कोटी रुपये असेल. आता ५०० कोटींमध्ये होणाऱ्या डेपोला जर सहा हजार कोटी लागले तर तो भुर्दंड बसेलच पण त्याचा जो वार्षिक देखरेखीचा खर्च आहे तोदेखील जवळजवळ पाच ते सहा पट अधि असेल. त्यामुळं हे शक्य नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. शिवाय, कोणीतरी चुकीचे सल्ले देत असून हा पोरखेळ चालला आहे. मुंबईकरांना मेट्रोपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न आहे,’ असा टोलाही त्यांनी लगावला आहे.