ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शिवसेनेला धक्का ; माजी आ.बाळासाहेब सानप पुन्हा भाजपमध्ये करणार प्रवेश

नाशिक : आगामी ग्रामपंचायत आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. बाळासाहेब सानप दुपारी 12 वाजता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईतील नरीमन पॉइंट येथील कार्यालयात भाजपप्रवेश करणार आहेत.

दरम्यान, बाळासाहेब सानप यांच्या प्रवेशाआधीच भाजपमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. यामुळे सानप यांना विरोध करण्यासाठी भाजपातील एक गट वरिष्ठांच्या भेटीला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर भाजपने बाळासाहेब सानप यांना पक्षात घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. पण आता भाजपमध्ये सानप यांच्या येण्यामुळे नाराजी असल्याचं समोर येत आहे.

मध्यंतरीच्या काळात बाळासाहेब सानप यांच्या मातोश्रींचे निधन झाल्याने त्याचे निमित्त साधून गिरीष महाजन यांनी भेट घेत पुर्नप्रवेशाचे बीज रोवले होते. जळगावातील बीएचआर घोटाळ्यासंदर्भात महाजन अडचणीत आल्याने प्रवेश लांबला. शिवसेनेने देखील सानप यांच्या सारखा मोहरा हातून जावू नये म्हणून मातोश्रीवर बोलावून घेताना मोठी जबाबदारी देण्याचे आश्‍वासन दिले होते. परंतू दोन दिवसातचं सानप यांच्या पुर्नप्रवेशावर विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी शिक्कामोर्तब केले. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय यांनी मध्यस्ती करताना सोमवारी प्रवेशाचा मुहूर्त निश्‍चित केला. मुहूर्ताची निश्‍चिती झाल्यानंतर सानप यांनी तातडीने समर्थकांना निरोप देत मुंबईत शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी केली आहे.

दुसरीकडे सानप यांना पक्षात ठेवण्यासाठी शिवसेनेनेही प्रयत्न सुरू केले आहेत. सानप यांनी दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांना पक्षात संघटनात्मक जबाबदारी देण्याबरोबरच महामंडळाचे आश्वासन देण्यात आल्याचं बोललं जात आहे. मात्र, या आश्वासनावर सानप अजूनही समाधानी नसल्याचं सांगण्यात येतं. विधानसभा निवडणुकीनंतर सानप अडगळीत गेले होते. आता पालिका निवडणुका आल्याने आपल्याला महत्त्व दिलं जात असून निवडणुका गेल्यावर पुन्हा जैसे थे परिस्थितीला सामोरे जावं लागणार असल्याचं सानप ओळखून आहेत. त्यामुळेच सानप यांनी शिवबंधन सोडून भाजपचा झेंडा हाती घेणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!