ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पुढील वर्षीच्या ‘आयपीएल’स्पर्धेत आठच संघ

मुंबई – आयपीएल स्पर्धेच्या पुढील वर्षीच्या मोसमात यंदाप्रमाणे आठच संघ खेळतील, असे बीसीसीआयने स्पष्ट केले असून सध्यातरी संघांच्या संख्येत वाढ करण्याचे कोणतेही धोरण नसल्याचेही सांगण्यात आले आहे.

 

आठ संघांदरम्यानच आयपीएल स्पर्धा खेळवली जाणार असून त्यानंतर 2022 साली संघांच्या संख्येत वाढ करून दोन नवे संघ सहभागी करून घेण्यात येतील. अर्थात, अहमदाबाद येथे 24 डिसेंबर रोजी होणाऱ्या बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत यासंबंधी निर्णय घेतला जाईल.

 

करोनाचा धोका आखातात कमी होता, त्यामुळे यंदाची स्पर्धा तिथे खेळवली गेली. दरवर्षी प्रमाणे मार्च-एप्रिलमध्ये होणारी ही स्पर्धा यंदा इतिहासात प्रथमच सप्टेंबर व नोव्हेंबर या कालावधीत खेळवण्यात आली. पुढील वर्षी म्हणजे 2021 साली ही स्पर्धा भारतातच होणार असल्याचेही संकेत बीसीसआयने दिले आहेत.

 

आयपीएलच्या पुढील मोसमाला चार महिन्यांपेक्षाही कमी कालावधी बाकी असल्याने नव्या संघांचा समावेश करणे अशक्‍य आहे. यादरम्यानच इंग्लंडचा भारत दौरा असल्याने सध्यातरी आयपीएलमधील संघांची संख्या वाढवण्यासाठी बीसीसीआय अनुकुल नाही. आयपीएलपूर्वी सर्व खेळाडूंची लिलाव प्रक्रिया तसेच प्रायोजकांच्या निर्णयाविषयीच बराच वेळ लागण्याची शक्‍यता असल्याने 2022 सालच्या मोसमात 10 संघांचा समावेश करण्याबाबत बीसीसीआय निर्णय घेईल.

 

यंदाच्या स्पर्धेसाठी ड्रीम11 समूहाने मुख्य प्रायोजकत्वाचे हक्क मिळवले होते. तसेच बीसीसीआयचा स्टार स्पोर्टसशी असलेला करारही संपुष्टात येणार आहे. त्यामुळे 2022 सालापासून दोन नव्या संघांसह नव्या क्रीडा वाहिनीच्या कराराचा विचार होणार आहे.

 

.. तर वेळापत्रक बिनसेल

पुढील वर्षीच्या स्पर्धेत 10 संघांचा समावेश झाल्या तर अडीच महिन्यांच्या कालावधीत 94 सामने खेळवताना आंतरराष्ट्रीय वेळापत्रक बिनसेल. त्याचबरोबर प्रक्षेपणासाठी नव्या कंपनीशी करार करावा लागणार आहे. सध्या या स्पर्धेसाठी हाती असलेला कमी कालावधी पाहता नवे संघ तयार करणे शक्‍य नसल्याचेही बीसीसीआयने सांगितले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!