ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोटच्या वटवृक्ष मंदिर समितीने घेतला ‘हा’ निर्णय,भाविकांसाठी महत्वाचे आवाहन

 

अक्कलकोट,दि.२३ :  श्री स्वामी समर्थांचे आद्य अवतार असलेल्या श्री गुरु दत्तात्रय यांची दत्त जयंती यंदा २९ डिसेंबर रोजी होत आहे.पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोटमध्ये हा सोहळा रद्द करण्यात आला आहे. ३१ डिसेंबर रोजी वर्षाखेर व १ जानेवारी रोजी नूतन वर्षाची सुरुवात होणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाकरिता प्रतिवर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. पण यंदा कोरोना लॉकडाऊनमुळे गेल्या आठ महिन्यापासून स्वामी समर्थांचे मंदिर दर्शनाकरिता बंद होते ते आता नुकतेच दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिर उघडल्यानंतर दत्त जयंती व नुतन वर्षाभिनंदन निमित्त स्वामी भक्तांची  दर्शनाकरिता गर्दी वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मंदिरात भाविकांचा सामुहिक संपर्क टाळण्याकरिता प्रशासनाच्या सूचनेनुसार सालाबादाप्रमाणे दत्त जयंती निमित्त आयोजित करण्यात येणारे भजन, कीर्तन, व दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५ ते रात्री १०
या वेळेत अक्कलकोट शहरातून सालाबादाप्रमाणे निघणारा
पालखी सोहळा इत्यादी सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. केवळ दत्तजयंती दिवशी पुरोहित व विश्वस्त मंडळ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सायंकाळी ६ वाजता श्री दत्त जन्म सोहळा संपन्न होईल. यावेळी कोणत्याही भाविकांचा सहभाग असणार नाही.तसेच दरवर्षी ३१ डिसेंबर व १ जानेवारी रोजी सरत्या वर्षाचा निरोप व नूतन वर्षाचे स्वागत समारंभ वटवृक्ष मंदिरात होत असतो.यासाठी कोल्हापूर, मुंबई येथील स्वामी भक्तांच्यावतीने व भजनी मंडळाच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांनी व फटाक्यांची आतषबाजी करून मोठ्या उत्साहात संपन्न होत असतो.
परंतु यंदा नूतन वर्षाचे हे धार्मिक कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत.याची सर्व स्वामी भक्तांनी नोंद घ्यावी असे आवाहन मंदिर विश्वस्त समितीच्यावतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!