अक्कलकोट, दि.३१ : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये यासाठी दोन जानेवारीपर्यंत मंदिर बंद ठेवण्याचे आदेश मागे घेण्यात आले असून आता १ जानेवारी म्हणजे नववर्षाच्या मुहूर्तावरच पहाटे पाच वाजल्यापासून मंदिर दर्शनासाठी उघडण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत.याबाबतची नवीन सूचना त्यांनी जारी केली आहे.या निर्णयामुळे स्वामी भक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे.
प्रारंभी कोरोना लॉकडाऊनमुळे गेल्या ९ महिन्यांपासून बंद असलेले श्री वटवृक्ष
स्वामी महाराज मंदीर दिवाळीच्या मुहूर्तावर उघडण्यात आले. त्यानंतर नाताळ व शासकीय सुट्टया, दत्त जयंती उत्सव, थर्टी फस्ट, व नुतन वर्षाचे स्वागत या पार्श्वभूमीवर वटवृक्ष मंदीरातील भाविकांची गर्दी लक्षात घेता कोरोनाचा संसर्ग बळावू नये या करीता जिल्हाधिकाऱ्यांनी २४ डिसेंबर ते २ जानेवारी २०२१ अखेर येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीर बंद ठेवून सदर कालावधीत भाविकांना अक्कलकोट शहरात प्रवेश मनाईचे आदेश पारित केले होते. या आदेशास अनुसरून येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीर समितीने मंदीर बंद ठेवण्याचा निर्णयही घेतला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांसोबत मंदीर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी चर्चा केली.या चर्चेत कोरोना संसर्ग मंदीरात होवू नये या करिता मंदिर परिसरात सोशल डिस्टन्सींगची व्यवस्था, मंदीर परिसरात सॅनिटायझर पुरवठा, मास्क वापरण्याबाबत मार्गदर्शन इत्यादी व्यवस्था दिवाळी पासून मंदीर उघडल्यानंतर करण्यात आल्याचे स्पष्ट करून याची अंमलबजावणी यापुढेही कायम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.यामुळे नुतन वर्षाच्या मुहूर्तावर वटवृक्ष मंदीर भाविकांना स्वामी दर्शनाकरीता खुले करण्यात यावे अशी विनंती केली.
या विनंतीबाबत विचार विनीमय करून जिल्हाधिकारी यांनी १ जानेवारी रोजी श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीर उघडण्याचे नविन आदेश पारित केले असल्याने नुतन वर्षाच्या मुहूर्तावर पहाटे ५ वाजल्यापासून भाविकांना स्वामी दर्शनाचा मार्ग मोकळा झाला असल्याचे स्पष्टीकरण मंदीर समितीचे प्रमुख महेश इंगळे यांनी दिले आहे.