सोलापूर : सोलापूर शहरात मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून 2 लाख 10 हजार रुपये किमतीच्या 10 मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. या दोन्ही मुलांच्या घरची परिस्थिती हलाखीची आहे. त्यामुळे गाड्या चालवण्याचा आनंद घेण्यासाठी दोन्ही मुले गाड्या चोरत होते, अशी कबुली त्यांनी दिली.
सोलापूर शहरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही दिवसांपासून मोटारसायकल चोरीच्या घटना घडत होत्या. वाढत्या मोटरसायकलच्या चोरीच्या घटनांच्या तपासासाठी पोलिसांचे वेगळे पथक कामाला लावलं. दरम्यान, पोलिसांना तपासणी दरम्यान काही मोटारसायकल बेवारस स्थितीत आढळून आल्या. याप्रकरणी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे एका अल्पवयीन मुलाकडे विचारणा केली. तेव्हा त्याने त्याच्या मित्रासोबत मिळून चोरी केल्याची कबुली दिली आहे.
या मुलांचा एक मित्र गॅरेजमध्ये काम करत असल्यामुळे त्याच्याकडून त्यांनी बनावट चावी तयार करुन घेतली. त्या बनावट चावीच्या आधारे हे चोर गाडी सुरु करायचे आणि गाडी चोरुन न्यायचे. गाडीमधील पेट्रोल संपल्यानंतर ते तिथेच गाडी सोडून दोन-तीन दिवसांनी दुसरी गाडी चोरत होते. या विधीसंघर्ष मुलांकडून दहा मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. या मोटारसायकलच एकूण किंमत 2 लाख 10 हजार रुपये असल्याची माहिती आहे. सध्या या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्याविरोधार चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.