करमाळा | तालुक्यातील पोथरे येथील शेतकऱ्याने मळणीसाठी एकत्र ढिगारा करुन ठेवलेल्या तूर पिकाला अज्ञातांनी जाळून टाकल्याची घटना घडलीय. यामुळे शेतकऱ्याचे १ लाख २० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत नुकसानग्रस्त शेतकरी गोपीनाथ पाटील (वय ३४, पोथरे, ता. करमाळा) यांनी करमाळा पोलिसात तक्रार नोंदविली आहे.
याबाबत अधिक असे की, गोपीनाथ पाटील यांची पोथरे शिवारातील गट नंबर २२ मध्ये अडीच एकर शेती आहे. त्यामध्ये तुरीचे पिक घेण्यात आले होते. एक जानेवारी रोजी मळणीसाठी तुरीचे पिक काढून शेतामध्ये एका बाजूला गोळा करुन ठेवण्यात आले होते. सायंकाळी उशीर झाल्याने दुसऱ्या दिवशी मळणीचे नियोजन केले गेले. त्यानुसार दोन जानेवारी रोजी सकाळी सात वाजता पाटील व त्यांचे कुटुंबिय शेतात गेले असता एकत्र केलेली तूर जळून खाक झाल्याचे आढळून आले. यामध्ये साधारणतः एक लाख वीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. असा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे.
दरम्यान या प्रकारानंतर पोथरे गाव कामगार तलाठ्यांनी नुकसानीचा पंचनामा केला आहे. मळणीसाठी काढून ठेवलेले पिक जाळण्याच्या प्रकाराचा शेतकरी वर्गामधून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. नुकसानग्रस्त शेतकरी पाटील यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून करण्यात आली आहे.