ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जामखेडमध्ये राष्ट्रवादीचा भाजपला धक्का ; माजी मंत्री शिंदेंच्या गावात राष्ट्रवादीचा विजय

अहमदनगर: आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपला धक्का देत जामखेड तालुक्यातील अनेक महत्त्वाच्या ग्रामपंचायतींवर झेंडा फडकवला आहे. माजी मंत्री शिंदे यांच्या गावातही राष्ट्रवादीनं बाजी मारली असून हा मोठा धक्का आहे.

शिंदे यांचे मूळ गाव असलेल्या चौंडी ग्रामपंचायतीवरही राष्ट्रवादीची सत्ता आली आहे. लवकरच कर्जत आणि जामखेड येथील नगरपालिकांच्या निवडणुका होत असून त्यामध्येही असेच चित्र राहील का, अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत.

जामखेड तालुक्यातील खर्डा ही सर्वांत मोठी ग्रामपंचायत आहे. तेथेही राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळविला. खर्डा येथे पवार यांनी चांगला जनसंपर्क ठेवत किल्ला आणि इतर विकासाच्या योजना दिल्या. ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी शिंदे व पवार यांच्यात आरोप प्रत्यारोप रंगले होते. बिनविरोध निवडणुकीसाठी पवार यांनी निधी देण्याची योजना जाहीर केल्यावर शिंदे यांनी हरकत घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर मतदारसंघात कोणाची दडपशाही, दादागिरी सुरू आहे, त्यावरूनही आरोपप्रात्यारोप रंगले होते. या दरम्यान १२ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली होती. आता उरलेल्यापैंकी महत्वाच्या ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात जात आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकीत खर्डा, चौंडी साकत, सह बहुतांशी गावात राष्ट्रवादी काँग्रेस ने बाजी मारली आहे. खर्डा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत एकुण १७ जागांपैकी ११ जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आल्याने भाजप च्या बालेकिल्याला मोठा धक्का बसला आहे. चौंडी ग्रामपंचायतीत शिंदे यांचा पॅनल पराभूत झाला असून तेथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृ्त्वाखालील पॅनलला ९ पैकी ७ जागा मिळाल्या आहेत. राम शिंदे यांचे पुतणे अक्षय शिंदे व बंधू अविनाश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने मोट बांधली होती. साकतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला ७ जागा तर भाजपला ४ जागा मिळाल्या आहेत. पिंपरखेड हसनाबाद ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीनेच बाजी मारली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!