नवी दिल्ली । केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या ६० दिवसांपासून दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शेतकरी संघटना येत्या २६ तारखेला दिल्लीत ट्रॅक्टर मोर्चा काढणार आहे. मात्र, शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली उधळून लावण्यासाठी शेतकरी नेत्यांना गोळ्या घालण्यात येणार होत्या, याबाबतचा खळबळजनक खुलासा समोर आला आहे.
शेतकऱ्यांनी सिंघू बॉर्डरवर शुक्रवारी रात्री आंदोलनस्थळी घुसलेल्या एका शुटरला पकडले आहे. शेतकऱ्यांनी या कथित शुटरला चेहरा झाकून प्रसारमाध्यमांसमोर आणले. शेतकरी नेत्यांना मारण्यासाठी मी आलो होतो अशी कबुली या शुटरने दिली. या शूटरने मीडियासमोरच दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.
या शूटरने सांगितले की, 26 तारखेला शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये गोळ्या झाडून वातावरण खराब करायचे होते. याचबरोबर 23 ते 26 जानेवारीदरम्यान शेतकरी नेत्यांवर गोळ्या झाडायच्या होत्या. तसेच त्याच्यासोबत आणखी काही जण असून यामध्ये महिलाही आहेत. या महिलांचे काम आंदोलकांना भडकविण्याचे होते. या शुटरने जाट आंदोलनातही गोंधळ घालण्याचे काम केल्याचे कबूल केले आहे.
शूटरने सांगितले की, 26 तारखेला चार लोक स्टेजवर असणार होते. त्यांना गोळ्या झाडण्याचे आदेश होते. यासाठी या चार लोकांचे फोटो मला देण्य़ात आले होते. हे सारे ज्या व्यक्तीने सांगितले तो राई पोलीस ठाण्याचा एसएचओ प्रदीप आहे. तो नेहमी त्याचा चेहरा झाकून ठेवायचा आणि बोलायचा, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या शुटरला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.