मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी सलग दुसऱ्या दिवशी इंधन दरात कोणताही बदल केलेला नाही. आज सोमवारी पेट्रोल आणि डिझेल दर स्थिर ठेवले आहेत. मागील १० महिन्यात पेट्रोल १५ रुपयांनी तर डिझेल १३ रुपयांनी महागले आहे.
देशभरात सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर उच्चांकी स्तरावर आहेत. नव्या वर्षात कंपन्यांनी दरवाढीचा सपाटा लावला आहे. ज्यामुळे मुंबई आणि दिल्लीत पेट्रोलने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव ९२.२८ रुपये आहे. एक लीटर डिझेलसाठी मुंबईतील ग्राहकांना ८२.६६ रुपये मोजावे लागतील.
दिल्लीत आजचा पेट्रोलचा भाव ८५.७० रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ७५.८८ रुपये आहे. चेन्नईत देखील आज पेट्रोलचा भाव ८८.२९ रुपये असून डिझेल ८१.१४ रुपये आहे. कोलकात्यात एक लिटर पेट्रोलचा भाव ८७.११ रुपये असून डिझेल ७९.४८ रुपये आहे. बंगळुरात आज एक लीटर पेट्रोलचा भाव ८८.२० रुपये असून डिझेलचा भाव ८१.०३ रुपये आहे.
जागतिक बाजारातील महागाईचे कारण पुढे करून पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरवाढीचा सपाटा लावला आहे. २०२१ च्या पहिल्या महिन्यात पेट्रोल आणि डिझेलमध्ये आठ वेळा दरवाढ झाली आहे. यात पेट्रोल आणि डिझेल सरासरी २ रुपयांनी महागले आहे.