मुंबई : मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्या विरोधात दिल्लीत गेल्या दोन महिन्यांपासून अखंडपणे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन होत आहे. संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा या झेंड्याखाली या आंदोलनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी, कामगार मुंबईतील आझाद मैदान येथे जमायला सुरुवात झाली आहे. नाशिक येथून निघालेल्या अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली या आंदोलनात सहभागी होण्यासाठी सुमारे १५ हजार शेतकरी मार्गस्थ झाले होते. हे शेतकरी आता आझाद मैदानात दाखल झाले आहेत. त्यामुळे हा परिसर शेतकऱ्यांच्या गर्दीने फुलून गेला आहे.
विविध वाहनांतून हजारो शेतकरी मुंबईत दाखल झाले असून, सोमवारी जाहीर सभेने शेतकऱ्यांचा मोर्चा राजभवनाच्या दिशेने निघणार आहे. महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांनी शेतकरी आंदोलनास पाठिंबा जाहीर केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी यापूर्वीच आंदोलनात सहभागी होणार असल्याचे जाहीर केले आहे.
आझाद मैदानात शेतकऱ्यांचे हे तीन दिवसांचे धरणे आंदोलन असणार आहे. या आंदोलनाला राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीचाही पाठिंबा असून आंदोलन शांततेत पार पाडण्यासाठी सर्वतोपरी खबरदारी घेण्यात येत आहे. आझाद मैदानात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून शेतकऱ्यांना कोणतीही आडकाठी येणार नाही, अशी काळजी घेण्यात येत आहे. आझाद मैदानात भव्य असा मंडपही उभारण्यात आला आहे. या आंदोलनादरम्यान राजभवनावर मोर्चाने जाऊन शेतकरी प्रतिनिधी मागण्यांचे निवेदनही राज्यपालांना देणार आहेत. २६ जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिनी आझाद मैदानात ध्वजारोहणही केलं जाणार आहे.