ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ आहे, मात्र बळीराजासाठी नाही ; शरद पवारांचा राज्यपालांवर जोरदार प्रहार

मुंबई | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात शेतकरी आक्रमक झाला असून मुंबई मध्ये शेतकऱ्यांनी किसान मोर्चा काढला आहे. शेकडो किलोमीटरचे अंतर कापून हे शेतकरी मुंबईत दाखल झाले आहेत. या मोर्चामध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आझाद मैदानात दाखल झाले. यावेळी शरद पवार यांनी केंद्र सरकारसह राज्यपालांवर जोरदार प्रहार केला आहे.

‘महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच असले राज्यपाल भेटले आहेत. शेतकरी मुंबईला त्यांना भेटायला आले असताना ते गोव्याला गेले आहेत. असा राज्यपाल पाहिला नाही. त्यांना बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौतला भेटायला वेळ, पण माझ्या शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही,’ असे म्हणत पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर हल्ला चढवला आहे.

यावेळी शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांना शेतकऱ्यांची कवडीची आस्था नाही. पंतप्रधान शेतकऱ्यांची विचार पूस करत नाही , हे शेतकरी काही पाकिस्तानमधील आहेत का? असा सवाल करत पंजाबमधील शेतकऱ्यांचं देशासाठी योगदान मोठं आहे, असेही ते म्हणाले.

शरद पवारांनी राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या शेतकरी बांधवांचं स्वागत केलं. ते पुढे म्हणाले, ही मुंबई नगरी ही चळवळीतील मुंबई आहे. संयुक्त महाराष्ट्र लढयात मुंबई नगरी आणि कामगार वर्ग सामील होते. देशातील शेतकऱ्यांना पाठिंबा देत आहात तुमचे मनापासून धन्यवाद देतो.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!