ध्यास विश्वसार्ह बातमीचा

बार्शीच्या डॉ.ऐश्वर्या रेवडकर यांना राज्य शासनाचा पुरस्कार जाहीर

 

बार्शी (प्रतिनिधी) बार्शीच्या कन्या डॉ. ऐश्वर्या रेवडकर यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने उत्कृष्ट वांड्मय निर्मिती बद्दल दिला जाणारा स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वांड्मय पुरस्कार जाहीर झाला आहे. वैद्यकीय क्षेत्रात सेवाव्रत घेऊन छत्तीसगढ येथील बिजापूर मध्ये आदिवासी, नक्षल भागात राहून काम करताना आलेले अनुभव डॉ. ऐश्वर्या यांनी बिजापूर डायरी या पुस्तकातून मांडले होते.

छत्तीसगड येथे स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून काम करताना आलेले अनुभव त्यांनी विजापूर डायरी या पुस्तकातून मांडले होते. या पुस्तकातून नक्षलग्रस्त, आदीवासी भागातील लोकांच्या जीवनातील वास्तव जगासमोर आले होते. साधना प्रकाशन पुणे यांनी या पुस्तकाचे प्रकाशन केले होते.

त्यांच्या या पुस्तकाची, लेखनाची दखल घेत राज्यशासनाने त्यांना प्रथम प्रकाशन ललीतगद्य विभागाचा तरभाई शिंदे हा पुरस्कार जाहीर केला आहे. या पुरस्काराचे स्वरूप ५० हजार रुपये रोख सन्मानपत्र, सन्मानचिन्ह असे आहे. बार्शी येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार प्रा.दिलीप रेवडकर, श्री शिवाजी महाविद्यालयाच्या प्रो.भारती रेवडकर यांच्या त्या कन्या आहेत. वैद्यकीय शिक्षणानंतर मोठ्या शहरात वैद्यकीय सेवा न करता छत्तीसगड मधील बिजापूर जिल्ह्यात नक्षली, आदिवासी भागात ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आवश्यकता आहे तिथे त्या सेवा बजावत आहेत. त्या ठिकाणी येणारे अनुभव त्यांनी बिजापूर डायरी या पुस्तकातून मांडले आहेत. या पुरस्काराच्या निमित्ताने बार्शीकरांच्या शिरोपेचात मनाचा तुरा रोवला गेला आहे. बार्शी तेथे सरशी ही म्हण डॉ. ऐश्वर्या यांच्या कार्यामुळे, लेखनामुळे पुन्हा एकदा खरी ठरली आहे.

राज्याशासनाचा पुरस्कार जाहीर होताच रायपूर (छत्तीसगड) चे जिल्हाधिकारी डॉ.अय्याज तांबोळी, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष नंदन जगदाळे, सचिव व्ही. एस. पाटील, सहसचिव पी. टी. पाटील, जयकुमार शितोळे, प्राचार्य सोपान मोरे, डॉ.सर्जेराव माने, शशिकांत पवार, सुरेश पाटील यांच्यासह वैद्यकिय, साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!