नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेत २०२१-२२ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करीत आहे. बजेटमध्ये सीताराम यांनी रेल्वे आणि बंदरांचा विकास करण्यासाठी १.१५ लाख कोटींची तरतूद जाहीर केली. यापैकी रेल्वेच्या विकासासाठी १.०७ लाख कोटी देण्यात आले आहेत.
गेल्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी ७०२५० कोटींची घोषणा करण्यात आली होती. यंदा गतवर्षीच्या तुलनेत ७ टक्के जादा निधीची मागणी रेल्वे मंत्रालयाने केली होती.नॅशनल रेल्वे प्लॅननुसार २०३० पर्यंत विकास केला जाणार आहे.
कोरोना व्हायरस रोखण्यासाठी लागू केलेल्या कठोर टाळेबंदीचा फटका रेल्वे सेवेला बसला. रेल्वेची लांब पल्ल्याची प्रवासी वाहतूक ठप्प असली तरी माल वाहतुकीतून रेल्वेला तारले. गेल्या सहा महिन्यात देशांतर्गत माल वाहतुकीतून रेल्वेने बऱ्यापैकी कमाई केली. मात्र रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण, दुहेरी आणि चौपदरीकरण, गेल्या अर्थसंकल्पात घोषीत करण्यात आलेली पायाभूत सुविधांच्या विकासाची कामे पूर्ण कारण्यासाठी हा निधी वापरण्यात येणार आहे.
चालू आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पात ३५,९६५ कोटी नवीन रेल्वे मार्ग, दुहेरीकरण आणि इतर कामांसाठी जाहीर करण्यात आले होते. लॉकडाऊनमध्ये वाहतूक ठप्प असल्याने ही विकास कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात रेल्वेला यश आले. कित्येक वर्षांपासून मंजूर झालेल्या नवीन रेल्वे स्टेशन उभारणीच्या कामांना गती मिळाली.