ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अमित ठाकरेंकडे ‘या’ भागाची जबाबदारी

मुंबई : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी शिवसेनेत प्रवेश करून २४ तास उलटण्याआधीच ज्येष्ठ नगरसेवक मंदार हळबे यांनी भाजपामध्ये प्रवेश करत मनसेला खिंडार पाडलं. दरम्यान, या दोघा नेत्यांनी मनसेला रामराम केल्यानंतर आज ‘कृष्णकुंज’वर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेण्यात आली. राज ठाकरे यांनी या बैठकीत मनसेच्या नेत्यांना महापालिका निवडणुकीसाठी लोकसभा मतदारसंघनिहाय जबाबदारी दिली आहे. विशेष म्हणजे, राज यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्यावरही मुंबई महापालिका निवडणुकीसाठीची जबाबदारी देण्यात आली आहे.

 

मनसेकडून आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी पक्षातील नेते आणि सरचिटणीस यांना जबाबदारी देण्यात आली आहे. लोकसभा मतदारसंघनिहाय प्रत्येक विभागासाठी दोन नेत्यांची निवड करण्यात आली आहे. यात अमित ठाकरे यांच्याकडे मुंबईतील उत्तर पूर्व मतदार संघातील वॉर्डांची जबाबदारी असणार आहे. अमित ठाकरे यांच्यासोबतीले मनसेचे नेते संदीप देशपांडे असणार आहेत. मुंबईच्या उत्तर पूर्व लोकसभा मतदार संघातील सर्व वॉर्डातील प्रचाराची आणि निवडणुकीच्या नियोजनाची जबाबदारी अमित ठाकरे यांच्याकडे असणार आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनीही या वृत्ता दुजोरा दिला आहे.

 

“अमित ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीसाठीची जबाबदारी स्वीकारली आहे. अमित अत्यंत संयमी आहे. त्यामुळे त्याच्या मार्गदर्शनाखाली पक्षाला उत्तर पूर्वमध्ये चांगलं यश मिळेल. त्याची मेहनतीची संपूर्ण तयारी आहे”, असं बाळा नांदगावकर म्हणाले. ‘कृ्ष्णकुंज’वर झालेल्या बैठकीनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मुंबईप्रमाणे ठाणे, पुणे, नाशिक, कल्याण डोंबिवली यासाठी एक नेता आणि एक सरचिटणीस यांची कमिटी तयार केली जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!