अहमदाबाद : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षातील वरिष्ठ, उच्चपदस्थ नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी न देण्याचे धोरण गुजरात भाजपने ठरवून टाकलेले आहे. इतर नेत्यांच्या नातेवाईकांनी ससेमिरा लावू नये म्हणून दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरातून मानदंड ठेवला गेला आहे. मोदी यांच्या पुतणीला नगरसेवक पदासाठी तिकीट नाकारण्यात आले आहे.
सोनल यांनी अहमदाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी पक्षाकडे तिकिटाची मागणी केली होती. पक्षांतर्गत ठरविण्यात आलेल्या नव्या नियमानुसार या निवडणुकीत वरिष्ठ नेत्यांच्या नातेवाईकांना तिकिटे दिली जाणार नाहीत, असे ठरलेले आहे. हाच नियम सोनल मोदी यांनाही लागू करण्यात आला आहे.
गुजरातमध्ये फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. सोनल या पंतप्रधान मोदी यांचे ज्येष्ठ बंधू प्रल्हाद मोदी यांच्या कन्या आहेत. बोदकदेव प्रभागातून सोनल यांनी तिकीट मागितले होते. भाजपने गुरुवारी उमेदवारांची पहिली यादी जारी केली, त्यात सोनल यांचे नाव नव्हते.
निवडणूक कार्यक्रम जाहीर
गुजरातेत अहमदाबाद, सूरत, राजकोट, बडोदा, जामनगर, भावनगर महापालिकांसाठी 21 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. राज्यातील 31 जिल्हा परिषदा, 231 पंचायत समित्या तसेच 81 नगर परिषदांसाठी 28 फेब्रुवारीला मतदान होईल. मतमोजणी 2 मार्चला होणार आहे.
गुजरात भाजपने उमेदवारी नाकारली
उच्चपदस्थांच्या नातेवाईकांना पदे न देण्याचे धोरण भाजप हा असा पक्ष आहे. इथे नियम सगळ्यांनाच सारख्या पद्धतीने लागू होतात. कुणीही अपवाद ठरत नाही. ठरू शकत नाही.
– खा. सी. आर. पाटील,
प्रदेशाध्यक्ष, गुजरात भाजप
मी पंतप्रधानांची पुतणी म्हणून तिकीट मागितले नव्हते. भाजपची सक्रिय कार्यकर्ता म्हणून तिकीट मागितले होते.
– सोनल मोदी, अहमदाबाद