ध्यास विश्वसार्ह बातमीचा

वाढीव नळपट्टी व घरपट्टी कमी न केल्यास आंदोलन छेडण्याचा भाजप नगरसेवकाने दिला इशारा

 

 

दुधनी दि. १४ : अक्कलकोट तालुक्यातील दुधनी नगरपरिषदेने मनमानी कारभार करत शहरवासीयांकडून भरमसाठ घरपट्टी व नळपट्टी वसूल करीत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. वाढलेले कर कमी न केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे भाजपचे विद्यमान नगरसेवक महेश पाटील यांनी मुख्याधिकारी आतिश वाळुंज यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

गेल्या चार वर्षापासून दुधनी नगरपालिकेचे कर्मचारी व टाऊन प्लॅनिंग अधिकाऱ्यांनी मिळून शहरातील मालमत्ता व नळधारकांना एकाच झोनमध्ये असताना वेगवेगळ्या पद्धतीचे कर आकारणी करून शहरवासीयांना आर्थिक भुर्दंड टाकत असल्याने संताप व्यक्त होत होता.

तरीही चारपट कर लावून नोटीस देत असल्याची तक्रार दुधनी शहरवासीय व काही पदाधिकाऱ्यांनी तत्कालीन प्रांताधिकारी ज्योती पाटील यांच्याकडे केली होती. त्यानंतर प्रांताधिकारी ज्योती पाटील व तत्कालीन मुख्याधिकारी धैर्यशील जाधव यांनी दुधनी नगर परिषदेत बैठक घेऊन भरमसाठ वाढून आलेल्या ३० ते ४० मालमत्ता धारकांचे ५० टक्के टॅक्स कमी केले होते. त्यानंतर दुधनी नागरिकांसमोर या विषयी बैठक लावण्यात आले होते. त्यावेळी तत्कालीन प्रांताधिकारी व मुख्याधिकारी यांनी वाढलेले कर कमी करण्यात आल्याचे तोंडी आश्वासन दिले होते. त्यानंतर शहरवासीयांनी मुख्याधिकारी धैर्यशील जाधव यांना भेटून कर कमी करण्यास सांगितले असता त्यांनी दखल घेतली नाही.

गेल्या महिन्यात नगरपरिषदेच्या बोर्ड मीटिंगमध्ये टॅक्स माफ करण्या संदर्भात एक मताने ठराव मंजूर करण्यात आले. या घरपट्टी-नळपट्टी बाबत अनेक वेळा शहरातील नागरिक व पदाधिकाऱ्यांनी मोर्चे व आंदोलने करूनही न्याय मिळत नसल्याचे संताप नागरिकांतून व्यक्त होत आहे. येत्या आठ दिवसात वाढलेले कर कमी न करून दिल्यास तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे निवेदन भाजपचे विद्यमान नगरसेवक महेश पाटील यांनी दुधनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आतिश वाळुंज यांना दिली आहे. या संदर्भात नगरसेवक महेश पाटील यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना देखील निवेदन दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!