ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोलापुरात शिव सजावट स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद,स्पर्धेत 320 शिवभक्तांचा सहभाग

 

सोलापूर,दि.२० : थोरला मंगळवेढा तालीमतर्फे आयोजित शिव सजावट स्पर्धेस उस्फूर्त प्रतिसाद मिळाला असून या स्पर्धेत 320 शिवभक्तांनी सहभाग घेतला असल्याची माहिती थोरला मंगळवेढा तालीमचे आधारस्तंभ तथा नगरसेवक अमोल शिंदे आणि मार्गदर्शक संकेत पिसे यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिकरीत्या श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव साजरा करता येत नाही. प्रत्येक शिवप्रेमींना घरोघरी शिवजयंती साजरी करता यावी त्याबरोबरच शिवरायांचा पराक्रम, त्यांचे कार्य आणि विचार यांना उजाळा मिळावा म्हणून शिव सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
गौरी, गणपती प्रमाणेच घरामध्ये शिव प्रतिमा, मूर्ती स्थापन करून त्यासमोर सजावट अथवा देखावे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. स्पर्धेसाठी नाव नोंदणी केलेल्या स्पर्धकांनी त्याचे फोटो व व्हिडिओ संयोजकांच्या व्हाट्सॲप नंबरवर पाठवायचे होते. त्यानुसार स्पर्धक व्हिडिओ आणि फोटो पाठवत आहेत. अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेल्या स्पर्धकांच्या घरी जाऊन परीक्षक तपासणी करून स्पर्धेचा निकाल देणार आहेत.
या स्पर्धेसाठी प्रथम – 21 हजार, द्वितीय – 15 हजार, तृतीय – 11 हजार, उत्तेजनार्थ – 2 हजाराची 10 बक्षिसे व प्रत्येकास स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र, तर स्पर्धेतील सहभागी प्रत्येक स्पर्धकांना प्रमाणपत्र व शिवरायांची मुर्ती देण्यात येणार आहे.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नगरसेवक अमोल शिंदे, संकेत पिसे, राम गायकवाड, राजशेखर बुरकुले, दत्तात्रय मेनकुदळे, अमोल कदम, समीर मुजावर, अनंत येरमपल्लू, आदी परिश्रम घेत आहेत.

स्पर्धेचा आनंद लुटला

यंदा कोरोनामुळे ‘शिवजयंती घराघरात, शिवजयंती मनामनात’ साजरी व्हावी यासाठी थोरला मंगळवेढा तालीमतर्फे ही शिव सजावट स्पर्धा घेण्यात आली. यातून शिवचरित्र समजून घेण्याबरोबरच शिवप्रेमींच्या कल्पनाशक्ती आणि सृजनशीलतेला वाव मिळाला. सोबतच स्पर्धेचा आनंद लुटता आला.

अमोल शिंदे
आधारस्तंभ ,थोरला मंगळवेढा तालीम

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!