अक्कलकोट,दि.२८ : अक्कलकोट येथे श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही गुरुप्रतिपदा उत्सव मोठ्या भक्तिभावात परंतू अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला. पहाटे ५ वाजता मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व पुरोहीत मंदार पुजारी यांच्या हस्ते श्रींची काकड आरती संपन्न झाली.
सकाळी ८:३० वाजता पारंपरिक देवस्थानचे लघुरुद्र करण्यात आले. दुपारी ११:३० वाजता श्रींना महानैवेद्य दाखविण्यात आले. सालाबादाप्रमाणे सायंकाळी ५ ते रात्री ९:३० या वेळेत अक्कलकोट शहरातून भजन, दिंड्यांसह सवाद्य निघणारा पालखी सोहळा व गुरूप्रतिपदेनिमीत्त आयोजित करण्यात येणारे सर्व धार्मिक कार्यक्रम यंदा रद्द करण्यात आले. राज्यात कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता मंदीरातील महाराजांचे नित्य पुजा, आरती वगळता सर्व धार्मिक कार्यक्रम व भाविकांच्या वतीने होणारे पुजा विधी अजूनही बंदच आहेत.
गुरूप्रतिपदेनिमीत्त व शनिवार, रविवारच्या शासकीय सुट्टया, पौर्णिमा सलग आल्याने नेहमी प्रमाणे प्रचंड स्वरूपात होणारी भाविकांची गर्दी यंदा कोरोना संसर्गाच्या भितीमुळे तुरळक प्रमाणात दिसून आली. मंदीरात येणाऱ्या भाविकांच्या माध्यमातून मंदिरात व अक्कलकोट शहर व परिसरात कोरोना संसर्ग बळावू नये या करिता मंदीर समितीच्या वतीने सर्व प्रकारच्या शासकीय नियमांचे पालन करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. येणाऱ्या भाविकांना मंदीर व परिसरात सॅनिटायजरची सोय करण्यात आली होती. मंदीरात प्रवेश करणाऱ्या भाविकांना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले होते.
अनाऊन्समेंटद्वारे व देवस्थानच्या सुरक्षा रक्षकांच्या वतीने नित्यपणे व सातत्याने तशा सुचना भाविकांना करण्यात येत होते भाविकही या नियमांचे काटेकोरपणे पालन करताना दिसून आले. दरम्यान कोरोना संसर्गाने राज्यभरात पुन्हा एकदा उसळी घेतल्याने नागरिकांच्या मनात कोरोनाविषयी भिती निर्माण झाली असून त्याचा परिणाम येथील वटवृक्ष मंदीरातील भाविकांच्या गर्दीवर झाल्याने प्रतिवर्षीपेक्षा यंदा भाविकांची संख्या अत्यल्प असल्याचे निदर्शनास आले.