ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कार प्रदान; दिवंगत भय्यूजी महाराज, दिग्दर्शक केदार शिंदे यांसह १० जणांना पुरस्कार

भारताच्या इतिहासात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई व दक्षिणेकडील चेन्नम्मा या महिला राज्यकर्त्यांचे कार्य दुर्गा, सरस्वती व लक्ष्मी देवींची आठवण करून देणारे आहे. अहिल्यादेवी होळकर या प्रजाहितदक्ष राज्यकर्त्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी राजे यांचेप्रमाणेच त्यांचे कार्य भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे केले.

सागा फिल्म्स फाउंडेशनच्या वतीने आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते रविवारी (दि. २८) राजभवन येथे संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, खासदार उदयनराजे भोसले, खासदार डॉ विकास महात्मे, होळकर घराण्याचे वंशज युवराज यशवंतराव होळकर व श्रीमती नायरिका होळकर, आमदार अभिमन्यू पवार व सागा फाउंडेशनचे अध्यक्ष सागर धापटे प्रामुख्याने उपस्थित होते.

इतिहासात जो समाज आपल्या पूर्वजांना विसरतो तो समाज संपतो. अहिल्यादेवी होळकर यांच्या सुशासन पद्धतीचे अनेक इंग्रज लेखकांनी वर्णन केले आहे. द्वारका व काशी येथे मंदिरांप्रमाणे अहिल्यादेवी होळकर यांनी उत्तराखंड येथील बद्रीनाथ मंदिराच्या पुनर्निर्माण कार्याला देखील सहकार्य केले असल्याचे सांगून समाजाने अहिल्यादेवी होळकर यांचे प्रती कृतज्ञ राहिले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.

करोनाचा प्रसार थोपवायचा असेल तर सर्वांनी हात धुणे, परस्परांमध्ये सुरक्षित अंतर राखणे ही खबरदारी घेणे आवश्यक आहे. मात्र करोनाला घाबरून घरी न बसता प्रत्येकाने पुरेशी काळजी घेऊन निर्भीडपणे आपापले काम केले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.

यावेळी दिवंगत भय्यूजी महाराज देशमुख यांना मरणोपरांत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. भय्यूजी महाराजांच्या कन्या कुहू देशमुख यांनी पुरस्कार स्वीकारला.

दिग्दर्शक व निर्माते केदार शिंदे यांना देखील राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. चित्रपट निर्माते सुनील मनचंदा, समाजसेवक नितीन शेटे, संत गाडगे महाराज मिशन धर्मशाळा ट्रस्टचे व्यवस्थापक प्रशांत देशमुख, विश्वासराव देवकाते, सोमनाथराव होळकर, राजस्थान येथील पोलीस अधिकारी हिमांशू सिंह राजावत, गडकिल्ल्यांचे अभ्यासक व संरक्षक मारुती गोळे व चित्रकार शेखर वसंत साने यांना देखील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!