ध्यास विश्वसार्ह बातमीचा

विसरु नका मराठीला,हिचा गोडवा अविट आहे… मसाप जुळे सोलापूरतर्फे मराठी दिनी काव्याविष्कार

सोलापूर दि. २८ (प्रतिनिधी )
विसरू नका मराठीला, हिचा गोडवा अवीट आहे.माझ्यासाठी मराठी आहे नाणे, एक बाजू ती तर दुसरी मी आहे… तुझ्या स्वर्गाहुनी मला, माझी झोपडीच बरी, तिच्या काळजात नांदे, गाथा आणि ज्ञानेश्वरी….. या आणि अशा एकाहुन एक मराठी काव्यरचना सादर करुन शहरातील मान्यवर कवींनी मराठी भाषा दिनाचा कार्यक्रम साजरा केला.

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते जेष्ठ साहित्यिक वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रजांचा जन्मदिन शनिवारी मराठी राजभाषा दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात आला. महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखेच्यावतीने इंडियन मॉडेल स्कूलच्या प्रा. ए. डी. जोशी सभागृहात यानिमित्त कवीसंमेलन पार पडले. कोरोनाचे सर्व नियम पाळुन हा कार्यक्रम करण्यात आला.

‘किती दूर वर आहे तूझा तो स्वर्ग आकाशी
माझा स्वर्ग मात्र आहे माझ्या आईच्या पायाशी..’ ज्येष्ठ कवी माधव पवार यांच्या या कवितेने भरभरून दाद मिळवली.’मी मराठी माय मराठी नारा गुंजेल आसमंतात.. नका विसरू मराठीला जोवर श्वास आहे या श्वासात..’ ही कविता प्रांजली मोहीकर यांनी सादर केली. रामचंद्र धर्मसाले यांनी ‘पाहिले न मी तुला… प्रिये नको हा अबोला’ ही कविता गावुन सादर केली. ‘छन्नी हातोडी घेऊन मी स्वतःचीच छकले काढली,मीच मला शोधायला तरी नाही सापडलो मी मला’ ही कविता मारुती कटकधोंड यांनी ऐकवली.

‘काळजाला देत जाते डाग मी.. वेदनांचा घेत असते माग मी’ ही गझल वसुंधरा शर्मा यांनी सादर केली.’मराठी माझ्या,अंगणातली तुळस! सात्त्विक, पवित्र संस्कृतीनं बहरलेली’ ही कविता शांता क्षिरसागर यांनी सादर केली. गिरीष दुनाखे आणि योजनगंधा जोशी यांच्या कवितांनाही दाद मिळाली.

प्रारंभी कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी शाखेचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी, कार्यध्यक्षा सायली जोशी, उपाध्यक्ष प्रशांत जोशी, प्रमुख कार्यवाह गिरीश दुनाखे, सहकार्यवाह संदीप कुलकर्णी, योजनगंधा जोशी, श्रीकांत कुलकर्णी, स्वानंदी देशपांडे,अमित कामतकर, सचिन चौधरी,अचला राचर्ला उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!