मुंबई: मुंबईत मागील वर्षी 12 ऑक्टोबर 2020 रोजी, बहुतांश भागात अचानक वीज गायब झाली होती. हा तांत्रिक बिघाड नव्हता, तर चीनने केलेला सायबर हल्ला होता, असा दावा न्यूयॉर्क टाइम्स या अमेरिकन वृत्तपत्राने केला आहे. भारत-चीन यांच्यात ज्यावेळी लडाखवरून तणाव निर्माण झाला होता, त्यावेळीच भारतामध्ये ब्लॅक आऊट करण्याच्या तयारीत चीन होता. चीनच्या हॅकर्सनी ऑक्टोबर महिन्यात भारतातील पॉवर ग्रीड (वीज वाहिन्या), आयटी कंपन्या आणि बँकिंग सेक्टरवर 40 हजार 500 वेळा हल्ला केला होता. न्यूयॉर्क टाईम्सनेच्या बातमीत गलवान खोर्यात भारत व चीनच्या लष्करात झालेल्या संघर्षानंतर मुंबईत वीज पुरवठा गायब करण्यामागे चीनचा हात होता, असा दावा केला गेला आहे.
सीमेवर चीनविरोधात कारवाई केली तर ते भारतातील पॉवर ग्रीड बंद करू शकतात, हे चीनला दाखवून द्यायचे होते, असेही बातमीत म्हटले आहे. त्यासाठी रेकॉर्डेड फ्यूचर या सायबर सिक्युरिटी कंपनीच्या अहवालाचा दाखल दिलेला आहे. अमेरिकेतील ही कंपनी सरकारी संस्थासोबत इंटरनेट संबंधित विषयांवर अभ्यास करते. परंतु, वीज यंत्रणा त्यांच्या कार्यकक्षेत नसल्यामुळे पुढील तपास करता आला नसल्याचे या कंपनीने म्हटले आहे.