कोची: देशातील चार राज्य आणी एका केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. यात केरळचा देखील समावेश आहे. दरम्यान केरळसाठी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार भाजपने जाहीर केला आहे. मेट्रो मॅन ई. श्रीधरन हे केरळ विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असणार आहेत. केरळमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ई श्रीधरन हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील, अशी घोषणा आमच्या पक्षाकडून करण्यात आलेली आहे, अशी माहिती केरळमधील एमओएस एमईए व भाजपा नेते व्ही मुरलीधरन यांनी ही माहिती दिली आहे.
केरळमध्ये भाजपाची सत्ता आणणं हे आपलं मुख्य उद्दीष्ट असून पक्षाने राज्यात यश मिळवल्यास मी मुख्यमंत्री पद स्वीकारण्यास तयार असेन असं श्रीधरन भाजपात प्रवेश करण्या अगोदरच म्हणाले होते.
तसेच, या वर्षी केरळमध्ये एप्रिल-मे महिन्यामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जिंकल्यास राज्यामध्ये आधारभूत विकास प्रकल्प उभारणे आणि राज्यावरील कर्जाचे ओझे कमी करण्यास प्राधान्य दिलं जाईल असं देखील श्रीधरन यांनी सांगितलं होतं.
२००२ रोजी दिल्ली मेट्रोच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली तेव्हा मेट्रोची धुरा ई. श्रीधरन यांच्याकडे होती. त्याचप्रमाणे ई. श्रीधरन यांनी कोकण रेल्वेच्या बांधकामासाठीही मोलाचं मार्गदर्शन केलं होतं. ई. श्रीधरन हे ८८ वर्षांचे असून त्यांचा जन्म मद्रास संस्थानामध्ये १९३२ साली करुकापुथूर येथे झाला होता. श्रीधरन यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सन्मान मिळालेले आहेत.
“केंद्र सरकार काहीही करायला गेलं की त्याला विरोध करण्याची फॅशनच आलीय”; शेतकरी आंदोलनावरुन ‘मेट्रो मॅन’ श्रीधरन संतापले
केंद्र सरकारने काहीही केलं तरी त्याला विरोध करण्याची फॅशनच देशात आलीय असा टोला शेतकरी आंदोलनासंदर्भात बोलताना श्रीधरन यांनी लगावला होता. शेतकऱ्यांना नवीन कायदे समजून घ्यायचे नाहीत किंवा राजकीय हेतूमुळे ते हे कायदे समजून घेऊ इच्छित नाहीत, असं देखील ते म्हणाले होते.