अक्कलकोट,दि.११ : अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष मंदीरात महादेवाच्या आराधनेने मोठया भक्तीमय वातावरणात महाशिवरात्री महोत्सव संपन्न झाला. वटवृक्ष मंदीरात स्वामींची मुर्ती ही भगवान शंकराच्या शिवलिंगावरच विराजमान आहे. त्यामुळे मंदीरातील महाशिवरात्रीस अनन्य
साधारण महत्व आहे.पहाटे ५ च्या काकड आरतीनंतर महाशिवरात्रीचा उपवास असल्याने वटवृक्ष मंदीर गाभाऱ्यातील शिवलिंगास पुरोहीत मोहन पुजारी व चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते जलधारा व बेलपत्री वाहून महाशिवरात्री आराधनेची सुरूवात करण्यात आली.
यानंतर सकाळी साडेअकरा वाजता नित्यनेमाने होणारी नैवेद्य आरती व रात्रीची शेजारती तसेच दर गुरुवारी रात्री आठ वाजता होणारा पालखी सोहळा महाशिवरात्रीचा उपवास व शिव आराधनेमुळे संपन्न झाला नाही. रात्री दहा ते बारा या वेळेत महाशिवरात्रीची महापूजा होऊन रात्री बारा वाजता श्रींची आरती संपन्न झाली. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर प्रशासनाच्या सूचनेनुसार महाशिवरात्री रोजी भाविकांना ठराविक अंतराने दर्शनास सोडण्यात आले. भाविकांनीही मंदिरात आल्यानंतर मास्क वापरून ठराविक अंतराने सुरक्षितपणे दर्शन घेऊन मंदीर समितीस व प्रसासनास सहकार्य करताना निदर्शनास आले. महाशिवरात्रीचे औचित्य साधून कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर मंदीर समितीच्यावतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात ४५ रक्तदात्यांनी रक्तदान करून सहकार्य केले.
याप्रसंगी बोलताना महेश इंगळे यांनी कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव पुन्हा वाढल्याने मानवी रक्ताची गरज ओळखून मंदीर समितीच्यावतीने सद्या दर पौर्णिमा, उत्सव व मंदीरातील गर्दीचा काळ पाहून वेळोवेळी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगून भाविकही या रक्तदान शिबीरास वेळोवेळी उत्स्फुर्त प्रतिसाद देत असल्याचे प्रतिपादन केले.
याप्रसंगी हेडगेवार रक्तपेढीचे शिबीर व्यवस्थापक सुनिल हरहरे, संतोष पराणे अनंता कुतवाल, श्रीशैल गवंडी, विपूल जाधव, जयसिंह इंगळे इत्यादी उपस्थित होते.