मुंबई,दि.२५ : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख बारमालकांकडून दरमहा १०० कोटी रुपये वसुली करण्याच्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहुन केला होता. तो वाद आता उच्च न्यायालयात पोहोचला आहे. यावरुन रज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यात आता स्वत: गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मध्यरात्री एक ट्विट केले आहे.
माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याची चौकशी लावली तर, मी त्याचे स्वागत करीन. सत्यमेव जयते…’ ‘ असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्राचा फोटो देखील ट्विट सोबत जोडला आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात असे लिहिले आहेत कि, माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना राज्य शासनाने दिनांक १७ मार्च २०२१ रोजी मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन हटविल्यानंतर त्यांनी माझ्यावर जे आरोप लावलेत त्या आरोपामध्ये काहीही सत्यता नाही. त्यामुळे मी आपणांस विनंती करतो की, त्यांनी जे आरोप लावले आहेत या संपूर्ण प्रकरणाची त्वरित चौकशी करुन ‘दूधका दूध पानीका पानी’ करावे, असे अनिल देशमुखांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.