अक्कलकोट, दि.१० : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरण रविवारी सकाळी ओव्हर ‘फ्लो’ झाल्याने सकाळी सात वाजता पाणी सोडण्यात प्रारंभ झाला आहे.
धरणाच्या तीन दरवाजाद्वारे प्रत्येकी ७० क्यूसेक याप्रमाणे दोनशे दहा क्यूसेक पाणी बोरी नदी पात्रात सोडण्यात आले आहे.तुळजापूर आणि नळदुर्ग भागातून ज्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे त्याच प्रमाणात धरणातून विसर्ग चालू आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे.
सध्या धरणांमध्ये ८२२ दशलक्ष घनफूट पाणीसाठा असून धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे.धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे सांगवी जलाशय तुडुंब भरून वाहत आहे.बोरी नदीवरती आठ कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे आहेत त्या बंधाऱ्यांनाही याचा उपयोग होणार आहे.त्याशिवाय नदीकाठच्या गावांना आणि शेतकऱ्यांनाही याचा मोठा फायदा होणार आहे. कुरनूर धरणावरती अक्कलकोट,मैंदर्गी आणि दुधनी या तिन्ही शहराचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. आता धरण शंभर टक्के भरल्याने या तिन्ही शहरातून देखील समाधान व्यक्त होत आहे.