मुंबई दिनांक 4 एप्रिल : सर्व वयोगटातील पत्रकारांना कोविड-19 ची लस तातडीने दिली जावी आणि कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या पत्रकारांच्या नातेवाईकांना किमान पाच लाख रूपयांची आर्थिक मदत करावी या मागण्यांसाठीचे उद्याचे इ-मेल पाठवा आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम,देशमुख यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे विविध पत्रकार संघटना आणि राज्यातील पत्रकारांना केले आहे.
ऑगस्ट 2020 पासून आजपर्यंत 78 पत्रकारांचे कोरोनाने बळी घेतले असले तरी गेल्या सव्वा महिन्यात 26 पत्रकारांचे निधन झाले आहे.यामध्ये तरूण पत्रकारांची संख्या चिंता वाटावी एवढी आहे.तरूण पत्रकारांना कामासाठी सातत्यानं बाहेर पडावे लागत असल्याने त्यांना कोरोनाची बाधा होण्याची जास्त भिती असते..हा विचार करून सरकारने सर्व वयोगटातील पत्रकारांना तातडीने कोविडची लस द्यावी अशी राज्यातील पत्रकारांची मागणी आहे.उत्तराखंड सरकारने या संबंधीचा आदेश काढला असून तिकडे सर्व वयोगटातील पत्रकारांना प्राधान्याने लस दिली जात असल्याचे पत्रकात नमुद करण्यात आले आहे.महाराष्ट्रात सातत्यानं सरकारकडे या संदर्भात पाठपुरावा केला मात्र सरकार उदासिन असल्याचे दिसल्यानंतर हे आंदोलनाचे हत्यार उपसावे लागले असल्याचे पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.मराठी पत्रकार परिषदेच्या पुढाकाराने करण्यात येत असलेल्या या आंदोलनात किमान 500 इ-मेल मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात येतील..शिवाय ट्टिटरवरूनही मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले जाईल.
राज्यात कोरोनाने 78 पत्रकारांचे निधन झाल्याची आकडेवारी मराठी पत्रकार परिषदेकडे असली तरी प्रत्यक्षात हा आकडा जास्त असण्याची शक्यता आहे.800 पेक्षा जास्त पत्रकार बाधित झालेले आहेत.असे असतानाही सरकार पत्रकारांच्या प्रश्नांप्रती उदासिन दिसते आहे.पत्रकाराचे निधन झाल्यास त्यांच्या नातेवाईकांना पन्नास लाखांची मदत देण्याची घोषणा राजेश टोपे यांनी केली होती पण ती हवेत विरली.पन्नास लाख रूपये नाही तर किमान पाच लाख रूपये तरी दिवंगत पत्रकारांच्या नातेवाईकांना दिले जावेत अशी मागणी देखील पत्रकात करण्यात आली आहे.केंद्र सरकारने देशातील पत्रकारांसाठी अशी योजना सुरू केली असून त्याच धर्तीवर राज्याने देखील दिवंगत पत्रकारांच्या नातेवाईकाना मदत देऊन सहकार्य करावे असे आवाहन निवेदनात करण्यात आले आहे.या दोन्ही मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी उद्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,आऱोग्य मंत्री,माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री,आणि महासंचालक यांना इ-मेल पाठवून आपल्या संतप्त भावना या मान्यवारांच्या कानी घालण्यात येणार आहेत.संघटना आणि व्यक्तीगत पातळीवर पत्रकार इ-मेल करतील तसेच ट्टिटरव्दारे देखील आपल्या भावना सरकारपर्यंत पोहोचवतील अशी माहिती पत्रकात देण्यात आली आहे.