अक्कलकोट : आज सीईओ स्वामी हे अक्कलकोट तालुक्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात सिईओ स्वामी यांनी अक्कलकोट तालुका कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेतला. यामध्ये सर्वप्रथम अक्कलकोट तालुक्यातील समर्थ नगर येथील कंटेनमेंट झोनची पाहणी करून कंटेनमेंट झोन मधील केलेल्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेतला.
अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिलेल्या गावभेट कार्यक्रमाबाबत आढावा घेताना दोन दिवसांत कोणकोणत्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तालूक्यास भेटी दिल्या याची माहिती घेतली. यावेळी लसीकरण सत्रास अचानक भेट देऊन लसीकरण कामाची पाहणी केली.
पंचायत समिती येथे शिक्षण विभागाचा यावेळी स्वामी यांनी सविस्तर आढावा घेतला. यामध्ये ऑनलाइन शिक्षण सुरू आहे का सुरू असेल तर त्याचे स्वरूप काय तसेच रोजगार हमी योजने मधून शाळा विकास कार्यक्रमांतर्गत शाळांचे प्राधान्य क्रम ठरून तातडीने कामे पूर्ण करून घेण्याच्या सूचना यावेळी स्वामी यांनी दिल्या.त्याचप्रमाणे कोरोना प्रतिबंधक विविध अभियानामध्ये शिक्षकांचा सहभाग याबद्दल सविस्तर माहिती घेऊन शिक्षकांनी कोरोनाच्या या संकट काळात हिरिरीने भाग घेऊन आरोग्य विभाग व प्रशासनास मदत करावी यामध्ये वैयक्तिक गाठीभेटी घेऊन ग्रामस्थांचे कोरोना विषयक घ्यावयाच्या काळजीबाबत प्रबोधन करावे.
शिक्षकांनी केलेल्या प्रबोधनाचा समाजमनावर नेहमीच चांगला परिणाम दिसून आलेला आहे त्यामुळे शिक्षकांनी या काळात चांगले काम करून लोकांना या संकटातून वाचण्याचे प्रबोधन करावे त्याचप्रमाणे लसीकरण करून घेण्याबाबत ग्रामस्थांना प्रवृत्त करावे असे आवाहन यावेळी स्वामी यांनी सर्व शिक्षकांना केले. त्याचप्रमाणे ज्या धोकादायक वर्गखोल्याना पाडण्याची मंजुरी मिळाली आहे अशा वर्गखोल्या पाडण्याचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे याबाबत सक्त सूचना सीईओ स्वामी यांनी गटशिक्षणाधिकारी यांना दिल्या.
यावेळी गटविकास अधिकारी महादेव कोळी, तालुका आरोग्य अधिकारी अश्विन करजखेडे, शिक्षण विस्तार अधिकारी सुहास गुरव आदी उपस्थित होते.