अक्कलकोट, दि.१० : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट शहरात उद्या (रविवारी) विशेष लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून चार केंद्रावर तब्बल १ हजार नागरिकांना लस उपलब्ध होणार आहे.त्यासाठी आवश्यक ती यंत्रणा उभी करण्यात आल्याची माहिती तहसील प्रशासनाने दिली आहे.शहरांमध्ये ग्रामीण रुग्णालय अक्कलकोट,बस स्टँड जवळील मल्लीकर्जून मंदिर, जुना तहसील कार्यालय तसेच कारंजा चौकातील उर्दू शाळा येथे ही लस मोफत दिली जाणार आहे.सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत वैद्यकीय यंत्रणा यासाठी सज्ज ठेवण्यात आली आहे. किमान एक हजार लोकांना उद्या लस देण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती तहसीलदार अंजली मरोड यांनी दिली आहे.पंचेचाळीस वर्षावरील सर्वांना ही लस मोफत असून सर्वांनी ती टोचून घ्यावी,सोबत सर्वांनी आधार कार्ड आणावे
असे आवाहन करण्यात आले आहे.तसेच कोव्हीशिल्ड या लसीबाबत कोणीही गैरसमज करून घेऊ नये, कुणालाही याचा त्रास झालेला नाही, ही लस सुरक्षित आहे, अफवांवर विश्वास ठेवू नये,कोरोनाला हरवण्यासाठी ही लस प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे, मात्र शासनाच्या धोरणानुसार ती टप्प्याटप्प्याने प्रत्येकाला मिळणार आहे. सध्या ४५ वर्षाच्यावरील नागरिकांना ही लस उपलब्ध आहे. त्यांनी ती घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले
आहे.