अक्कलकोट,दि.२४ : पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचे स्पष्ट आदेश आहेत अत्यावश्यक कारणाशिवाय कोणालाही सोडू नका आणि प्रशासनाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करा, अशा सूचना
अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिल्या.शनिवारी अक्कलकोट तालुक्यातील कर्नाटक राज्याला जोडणा-या रस्त्यावर हिरोळी येथील तपासणी नाक्याची पाहणी करून उत्तर पोलीस स्टेशन येथे घेतलेल्या संयुक्त आढावा ते बोलत होते.
आंतरराज्य व आंतरजिल्हा वाहतुक अत्यावश्यक कारणाशिवाय बंद करा.फिक्स पाईंट,वागदरी बॉर्डरवरील हिरोळी, दुधनी व एम.एस.ई.बी चौकातील नाकाबंदीत कडक तपासणी करा.स्वतःची काळजी घ्या व कोरोना शहर व तालुक्यात पसरणार नाही अशी काळजी घ्या व उपाययोजना करा. विनाकरण वाहन फिरताना आढळल्यास जप्त करा. तपासणी नाक्यावर प्रत्येक वाहनांची नोंद घ्या व कडक अंमबजावणी करा अशा सुचना अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांनी केल्या.
वागदरी व एम.एस.ई.बी चौक सोलापूर रस्ता नाकाबंदी व दुधनी (सिन्नुर) येथे तपासणी नाका कार्यान्वित करण्यात आले असुन तालुक्यात एकुण आंतरजिल्हा व आंतरराज्य जोडणारे २२ रस्ते बंद करण्यात आले असुन पास किंवा अत्यावश्यक कारणाशिवाय इतरांना प्रवेश दिला जाणार नाही,अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.संतोष गायकवाड यांनी दिली.
शहर तालुक्याला जोडणा-या आंतरजिल्हा व आंतरराज्य काही रस्ते बंद केले असुन काही ठिकाणी तपासणी नाका सुरू करून अत्यावश्यक सेवेसाठी चालु ठेवण्यात आले आहेत,अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी दोन्ही पोलिस स्टेशनचे अधिकारी उपस्थित होते.