ध्यास विश्वसार्ह बातमीचा

नव्या कृषी कायद्याचे फायदे शेतकऱ्यांना समजावून सांगा,भाजपा अध्यक्ष नड्डा यांचे प्रदेश कार्यसमिती बैठकीत आवाहन

 

मुंबई,दि.८ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी, कामगार वर्गाच्या विकासासाठी आणलेले नवे कायदे ऐतिहासिक आहेत. या कायद्यांविरोधात केवळ राजकीय हेतूने अपप्रचार सुरु आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी जनतेत जाऊन या अपप्रचाराला चोख उत्तर दिले पाहिजे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. जे. पी. नड्डा यांनी गुरुवारी केले. भाजपा प्रदेश कार्यसमिती बैठकीला मार्गदर्शन करताना श्री. नड्डा बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील , विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस , प्रदेश संघटन मंत्री विजयराव पुराणिक , विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर तसेच केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर , पीयूष गोयल , रावसाहेब दानवे, संजय धोत्रे , पक्षाचे राष्ट्रीय व प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते.
नड्डा म्हणाले की , कोरोनाच्या प्रसार काळात देशातील आरोग्य यंत्रणेची स्थिती लक्षात घेता या महामारीचा प्रसार वेगाने होईल , असा अंदाज प्रगत राष्ट्रांनी व्यक्त केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन चा निर्णय वेळेवर घेऊन कोरोना च्या प्रसाराला अटकाव केला. पाश्चात्य राष्ट्रांनी वर्तविलेले अंदाज खोटे ठरवले. भारताने केलेल्या उपाययोजनांची आता बड्या राष्ट्रांकडून प्रशंसा होत आहे. लॉकडाऊन काळात जाहीर केलेल्या आत्मनिर्भर पॅकेजद्वारे उद्योगपती , शेतकरी अशा समाजातील सर्वच वर्गांना विविध योजनांचा लाभ दिला जात आहे. या योजनांची माहिती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी , कार्यकर्त्यांनी सामान्य जनतेपर्यंत पोहचविली पाहिजे. मोदी सरकारने देशाच्या संरक्षणाशी कोणतीही तडजोड केली नाही . त्यामुळे गेल्या ६ वर्षांत चीनच्या सीमेवर रस्ते , पूल यांची विक्रमी वेळेत उभारणी झाली.चीन त्यामुळेच अस्वस्थ झाला आहे. आता भारत कोणत्याही दबावापुढे झुकणार नाही, हेच नरेंद्र मोदी यांनी दाखवून दिले आहे. श्री. नड्डा यांनी यावेळी गरीब कल्याणासाठी मोदी सरकारने सुरु केलेल्या योजनांचा आढावा घेतला.
महाराष्ट्रात आज सरकार नावाच्या व्यवस्था अस्तित्वात आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होतो आहे. सत्ताधारी पक्षात समन्वय नसल्याने कारभाराचा बोजवारा उडाला आहे. राज्य सरकारचे अपयश कार्यकर्त्यांनी जनतेसमोर मांडले पाहिजे. महाराष्ट्रातल्या जनतेने भाजपाला जनादेश दिला होता . मात्र भाजपाचा नव्हे तर जनमताचा विश्वासघात करून हे सरकार सत्तेत आले आहे. आता महाराष्ट्रात
निवडणुका झाल्या तर भाजप स्वबळावर सत्तेत येईल, असा विश्वासही श्री . नड्डा यांनी व्यक्त केला.ते म्हणाले की , अन्य पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यात मोठा फरक आहे. अनेक पक्ष एका कुटुंबापुरते मर्यादित आहेत. भाजपा हा पक्ष एक कुटुंब आहे. भाजपाची विचारसरणी आणि अन्य पक्षाची विचारसरणी यात मोठा फरक आहे. भाजपाच्या विचारसरणीत सांस्कृतिक राष्ट्रवादाला महत्वाचे स्थान आहे. एकात्म मानवतावाद, अंत्योदय हा याच विचारसरणीचा भाग आहे. समाजातील सर्वात उपेक्षित वर्गाच्या उन्नतीला प्राधान्य देणे हा भाजपाच्या विचारसरणीचा आत्मा आहे. जनसंघापासून आपण या विचारसरणीचा अंगीकार केलेला आहे. या विचारसरणीची टिंगल करणारे पक्ष आज कोठे आहेत हे शोधावे लागते आहे. कार्यसमितीच्या सदस्यांनी पक्षाची विचारसरणी आत्मसात करणे आवश्यक आहे. अन्य पक्षांची कार्यशैली आणि भाजपाची कार्यशैली यात मोठा फरक आहे हे लक्षात घेतले पाहिजे. भाजपमधील पक्ष संघटनेच्या नियुक्त्या कार्यकर्त्यांचे मूल्यांकन करूनच होतात. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या मर्जीनुसार पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होत नाहीत,असे ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!