दिल्ली : कोरोनाच्या काळात अनेक क्षेत्रांना फटका बसला आहे. विविध क्षेत्रांतील कर्मचारी असो वा सर्वसामान्य नागरिक, इतकेच काय तर श्रमिक वर्गासह मजूर वर्गाचीदेखील त्यातून सुटका झालेली नाही. अशा वेळी या गरजूंसाठी प्रशासनाने मदतीचा हात पुढे केला खरा. पण त्यासाठी आधारकार्डची सक्ती केल्याने अनेकांसमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. अखेर आधारकार्ड सक्तीचा निर्णय भारतीय विशिष्ट ओळखपत्र प्राधिकरणाने मागे घेतला असून यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
भारतीय विशिष्ट प्राधिकरणाने यासंदर्भातील निर्णयाची घोषणा शनिवारी केली. हा निर्णय जाहीर करताना आधारकार्ड नसेल तर कोणत्याही लाभापासून वंचित ठेवले जाणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे. तर ज्यांच्याकडे आधारकार्ड नाही अशा लोकांनाही सेवा आणि सरकारी योजनेचा फायदा घेता येणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
रेशनकार्ड आधारकार्डशी लिंक नसल्याचे कारण पुढे करत अनेक रेशनकार्ड रद्द करण्यात आली होती. यासाठी सुप्रीम कोर्टात याचिकाही दाखल करण्यात आली होती.