अक्कलकोट, दि.१८ : सध्या कोरोनाची दुसरी लाट महाभयंकर आहे.अशा परिस्थितीत लोक डॉक्टरांना देव मानत आहेत त्यामुळे डॉक्टरांनीही पैशाअभावी उपचार न थांबवता सेवा म्हणून कार्य
करावे आणि पहिल्यांदा त्या रुग्णाचा जीव वाचवावा,असे आवाहन शिवसेना तालुका उपप्रमुख आनंद बुक्कानूरे यांनी केले आहे.
कोरोनाची साथ लक्षात घेऊन ग्रामीण भागात काही डॉक्टर पैसे उकळत आहेत याबाबत तक्रारी येत असून ज्यांना कुणाला केवळ पैशाअभावी उपचार नाकारले गेले आहेत त्यांनी थेट शिवसेना मदत कक्षाशी संपर्क साधावा, त्यांना निश्चित मदत केली जाईल.शिवसेना कोविड समिती जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बरडे व उपजिल्हा प्रमुख संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकोट शिवसेनेचेवतीने आम्ही अनेक रुग्णांना मदत करत आहोत,असे तालुका उपप्रमुख आनंद बुक्कानुरे यांनी सांगितले.
आतापर्यंत मला तालुक्यातील शेकडो लोकांनी संपर्क केला आहे यातून शासकीय नियम सोडून लावलेल्या ३२ जणांचे ३० टक्केपेक्षा जास्त बिल कमी करून दिले आहे.कित्येक रूग्णांना व्हेंटिलेटर, ऑक्सिजन संबंधित डॉक्टरांशी संवाद साधुन बेड मिळवून दिले आहे व इतर लोकांच्या संबंधित डॉक्टराशी व मॅनेजंमेटशी संपर्क करून १५ ते २० टक्के बिलामध्ये सवलत मिळवून दिले आहे.
सध्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यात शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे लोकांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचा प्रयत्न चालू आहे. या पुढेही हे काम करत राहणार असल्याचे बुक्कानुरे यांनी सांगितले.
यात जर पैशा अभावी कोणी उपचार नाकारत असेल तर अक्कलकोट शिवसेनेशी संपर्क करा,आपल्या रूग्णावर उपचार करण्यास भाग पाडु,असे ही ते म्हणाले.यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.