ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोलापूरात कुटुंब प्रबोधन आणि विविध संस्थांतर्फे 21 जूनपासून योगसप्ताह ; एकच लक्ष “योगयुक्त, रोगमुक्त, स्वस्थचित्त कुटुंब’ अभियान

सोलापूर, दि. ६ : 21 जून या जागतिक योग दिनाच्या निमित्ताने कुटुंब प्रबोधन पश्चिम महाराष्ट्र प्रांत सोलापूर जिल्हा आणि समाजातील विविध सामाजिक संस्था, संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने 21 ते 27 जून या कालावधीत योग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

समाजातील अधिकाधिक कुटुंबांनी या सप्ताहात योगाचे शिक्षण घ्यावे आणि निरंतर योग साधना करावी. यासाठी योगयुक्त, रोगमुक्त आणि स्वस्थचित्त कुटुंब अभियान राबविण्यात येत आहे. हे संपूर्ण अभियान ऑनलाईन पद्धतीने होणार आहे, अशी माहिती सोलापूरचे कुटुंब प्रबोधन संयोजक प्रा. देवानंद चिलवंत यांनी दिली आहे.

सर्व जगाला आध्यात्मिक शक्तीचे ज्ञान देणाऱ्या भारतामध्ये अडीच हजार वर्षापूर्वी पतंजली मुनींनी अद्वैत वेदांत दर्शनाचे अनुभूती शास्त्र म्हणून अष्टांग योगाची सूत्रे मांडली व ती भारतीय जीवन पद्धतीची अविभाज्य घटक बनली. परंतु मध्यंतरीच्या काळात पाश्चिमात्य जीवन पद्धतीच्या प्रचंड प्रभावामुळे कुटुंबातील जीवन पद्धतीत दोष निर्माण झाले. त्यातच भर म्हणून की काय पैशाचा प्रभाव, आळस, बेशिस्त दिनचर्या, अनियंत्रित खान-पान, आभासी गरजांची साखळी, महत्त्वाकांक्षा यामुळे कौटुंबिक व सामाजिक जीवन भरकटून गेले.आरोग्यावर वैश्र्विक महासंकटाचे झंझावात आले. श्वास, रोगप्रतिकारक शक्ती, शुद्ध रक्त, भयमुक्त मन यांचीच आणीबाणी निर्माण झाली.म्हणून कुटुंब प्रबोधनतर्फे एक लक्ष योगयुक्त, रोगमुक्त आणि स्वस्थचित्र कुटुंब अभियान हाती घेण्यात आले आहे.

जागतिक योग दिन 21 ते 27 जून का सप्ताहात पश्चिम महाराष्ट्रात एक लाख घरात ऑनलाईन सहकुटुंब योग कार्यक्रम प्रशिक्षित गटप्रमुख, स्वयंसेवकांकडून केला जाणार आहे. या अभिनव अशा कार्यक्रमात कुटुंबातील सर्व वयोगटातील सदस्यांनी एकाच वेळी योग ऑनलाईन योग करावयाचा आहे. यातून आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत होणार आहे.

घरातील सर्वांनीच एकाचवेळी योगाची प्रात्यक्षिके केल्याने सर्वांना एकाचवेळी योग शिकता येणार आहे. आणि सर्वांनीच योग केल्याने योगाद्वारे मिळणाऱ्या शक्तीतून संपूर्ण कुटुंब स्वस्थ चित्त होणार आहे. तसेच भविष्यातील कसल्याही आरोग्य संकटाशी सामना करण्याचे मानसिक, शारीरिक सामर्थ्य निर्माण व्हावे, असे उद्दिष्ट आहे.

हा कार्यक्रम ऑनलाईन होणार आहे. यासाठी सोलापूर जिल्ह्यात तयारी सुरू करण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी आणि सहभागी होण्यासाठी सोलापूर जिल्ह्याचे कुटुंब प्रबोधन प्रमुख प्रा. देवानंद चिलवंत (मोबाईल क्रमांक 9511273149) आणि योग सप्ताह प्रमुख ऍड. अमोल देशपांडे (9860451009) संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!