कोरोनाने मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांचा समावेश अपघाती विमा योजनेत करावा, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
अक्कलकोट : राज्यात सध्या कोरोनामुळे अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे यामध्ये त्यांची कौटुंबिक हानी मोठी झाली आहे. त्यांना कुठल्याही योजनेचा लाभ मिळू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये शासनाने स्व. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेअंतर्गत याचा समावेश करून त्यांना लाभ द्यावा, अशी मागणी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. यासंदर्भातील निवेदन त्यांनी ठाकरे यांच्याकडे दिले आहे.
कोरोना काळात जे लोक फ्रंटलाईनला काम करत आहेत त्यांना शासनाने विमा योजना लागू केली आहे. त्यामुळे बहुतांश घटकांना या योजनेचा लाभ मिळत आहे परंतु सर्वसामान्य शेतकरी मात्र यामध्ये भरडला जात आहे. एखाद्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर त्यांचे कुटुंब रस्त्यावर येत आहे.त्यांच्या मुलाबाळांचा प्रश्न मोठा आहे त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालणार असा प्रश्न कुटुंबात समोर निर्माण झाला आहे. शासनाकडे सध्या स्व. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना आहे त्या अंतर्गत मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांचा अपघाती विमा मिळतो. किमान त्या योजनेचा लाभ तरी या शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे, अशी मागणी शेतकऱ्यांची देखील आहे.
फक्त या योजनेमध्ये निकष बदलण्याची गरज आहे ते सरकारने करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. जेणेकरून एखाद्या कुटुंबातील शेतकऱ्याचा मृत्यू कोरोनामुळे जर झाला तर त्यांचे कुटुंब रस्त्यावर येऊ नये याची काळजी सरकारने घ्यावी. केवळ अक्कलकोट आणि सोलापूरचा नव्हे तर संपूर्ण राज्यात हा प्रश्न निर्माण झाला आहे. कोविडमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी कुटुंबातील कर्ते व्यक्तीचे निधन झाले आहेत.
त्यामुळे त्या कुटुंबाचे जगणे जिकीरीचे झाले आहे. अशा लोकांना न्याय देण्यासाठी गोपीनाथ मुंडे अपघात विमाचे निकष बदलून कोरोनाने मृत्यु झालेल्या शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश करावा,ही मागणी आपण प्रामुख्याने केली असल्याचे आमदार कल्याणशेट्टी यांनी सांगितले.