ध्यास विश्वसार्ह बातमीचा

तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर सोलापूर महापालिकेकडून लहान मुलांबद्दल मोठी खबरदारी, डॉक्टरांची घेतली बैठक

सोलापूर- सोलापूर महानगर पालिकेच्यावतीने covid-19 तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने तयारी सुरू करण्यात आली आहे. यामध्ये लहान मुलांना संसर्ग मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असून त्या अनुषंगाने आज उपायुक्त धनराज पांडे यांनी आरोग्य विभाग, आर बी एस के अंतर्गत सर्व डॉक्टर्स व शिक्षण विभागची बैठक घेतली.

या बैठकीत शहरातील लहान मुलांना पोषक आहार, स्वच्छ पाणी तसेच त्यांना स्वच्छता कशी राखावी याबद्दल चर्चा करण्यात आली. लहान मुलांमध्ये स्वच्छता राखल्याने संसर्ग टाळता येईल व कुठलाही आजार होऊ नये म्हणून लहान मुलांमध्ये स्वच्छते बद्दल जागृती करणे व पोषक आहार व्यवस्थित ठेवले तर कुठलेही आजार होणार नाही. तसेच लहान मुलांमध्ये गंभीर आजार असलेल्या मुलांचा शोध महापालिका व शिक्षण विभाग तसेच खाजगी शाळेच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. व त्यांची यादी तयार करून यादी तयार झाल्यावर त्यांच्यावर वैयक्तिक लक्ष देण्यात येणार असून त्यासाठी सर्व शाळांना तसेच सूचना देण्यात आले आहे.

सर्व शाळांनी अशा गंभीर आजार असलेल्या मुलांची यादी तयार ठेवावी व अशा मुलांना डफरीन हॉस्पिटल येथे तपासणीसाठी पाठवावी. डफरीन हॉस्पिटल या ठिकाणी गंभीर आजार असलेल्या मुलांना रक्त तपासणी,एमआरआय स्कॅन, एक्स-रे व त्यांना लागेल असे विविध तपासण्या या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येईल. तसेच शहरातील सामान्य नागरिकांनी आपल्या लहान मुलाला कुठल्याही आजार झाल्यास त्याना आमच्या नागरिक आरोग्य केंद्रात किंवा शहरातील कोणत्याही बालरोगतज्ञ यांच्याकडे जाऊन तपासणी करावी.

covid-19 साठी महापालिकेचे एक टास्क फोर्स तयार करण्यात आले आहे. तसेच शहरातील प्रत्येक हॉस्पिटल मध्ये लहान मुलांसाठी 20 टक्के बेड राखीव ठेवण्यात आले आहे. अशी माहिती उपायुक्त धनराज पांडे यांनी दिली.

या बैठकीस आरोग्य अधिकारी अरूंधती हराळकर,प्रशासन अधिकारी कादर शेख,सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. बोराडे, कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. सिरशेट्टी, बाल रोग तज्ञ डॉ. मंजुषा चाफळकर तसेच शहरातील आर.बी.एस.के अंतर्गत सर्व डॉक्टर्स उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!