गुरुशांत माशाळ
दुधनी,दि.१४ : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील दुधनी व परिसरात मंगळवारी रात्री साडे नऊ वाजता वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यामुळे दुधनी आणि परिसरातील सर्व ओढे-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. दुधनी शहरात सर्वाधिक ५७८ मि. मि. पावसाची नोंद झाली आहे. बारा तासांहून अधिक काळ पाऊस पडल्याने उभ्या पिकांमध्ये पाणी साचले आहे.
जोरदार वादळी वाऱ्यामुळे दुधनी आणि परिसरातील ऊस, केळी, कापूस, तूरी सह इतर शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस जमीनदोस्त झाली आहे. उभ्या पिकांमध्ये पाणी साचल्याने पिके मान खाली घातली आहे. दरम्यान, पुढील तीन दिवस अशीच परिस्थिती राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविले आहे.