दिल्ली : दिल्ली हायकोर्टाने ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. हायकोर्टाने ठाकरे गटाची याचिका फेटाळली आहे. पक्षचिन्ह गोठवण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती. शिवसेनेच्या ठाकरे गटाची याचिका हायकोर्टानं फेटाळली आहे. त्याशिवाय निवडणूक आयोगाला पक्षचिन्हाचा निर्णय तातडीनं घेण्याचे आदेश हायकोर्टानं दिले आहेत.
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या आधी एकनाथ शिंदे गटाच्या मागणीनुसार केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव व पक्ष चिन्ह गोठवण्याचा निर्णय दिला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटालाही शिवसेना नाव व ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह वापरण्यास मज्जाव करण्यात आला होता. दोन्ही गटांमध्ये पक्ष व पक्षचिन्हावर हक्का सांगण्यासाठी सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने हे निर्देश दिले होते. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. मात्र दिल्ली उच्च न्यायालयाने ठाकरे गटाची याचिका फेटाळून लावल्याने ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.
निवडणूक आयोगाचा अधिकार मान्य करत दिल्ली हायकोर्टानं शिवसेनेची याचिका फेटाळली आहे. त्याशिवाय चिन्हाचा अंतिम निर्णय तातडीने घ्यावा, असे आदेश निवडणूक आयोगाला हायकोर्टानं दिले आहेत. पक्षचिन्हाच्या निर्णायाचे अधिकार हे निवडणूक आयोगालाच आहेत, त्यामध्ये कोर्ट पडत नाही. त्यामुळेच पक्षचिन्हाचा अंतिम निर्णय होईपर्यंत धनुष्यबाण गोठवलेलंच असेल.