रायगड जिल्ह्यातील खालापूर जवळच्या इरशावाडी गावावर दरड कोसळली ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटना स्थळी दाखल
रायगड : रायगड जिल्ह्यातील खालापूर जवळच्या इरशावाडी या गावावर मोठी दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी रात्री ११ ते १२ वाजेच्या सुमारास गावात दरड कोसळली असून त्यात ४० ते ५० घरं मलब्याखाली दबळे गेल्याची माहिती समोर आली आहे. पाच ते सहा लोकांचे मृतदेह मलब्यातून बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या कुटुंबियाना पाच लाख रुपयांचा मदत जाहीर केली आहे.
खालापूर येथील इरसाल गडाच्या पायथ्याशी असलेल्या वसाहतीवर दरड कोसळली आहे. वसाहतीत आदिवासी ठाकूर समाजाची घरे आहेत. खालापूरमधील चौक गावापासून सहा किलोमीटर अंतरावर डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरच्या भागात ही आदिवासी वाडी आहे.
गावातील मतदारांची संख्या २०० वर असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. त्याचबरोबर घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आणि NDRF च्या दोन पथके बचावकार्यासाठी घटनास्थळी पोहचल्याची माहिती आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहाटेच घटना स्थळाकडे रवाना झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार ही आपत्ति व्यवस्थापन कक्षात बसून घटनेवर लक्ष ठेवून आहेत. मंत्री गिरीश महाजन, मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे, मंत्री उदय सामंत, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे हे देखील घटना स्थळी पोहोचले आहेत.