ध्यास विश्वसार्ह बातमीचा

गुड न्यूज … प्रसारभारती ॲपचा सर्वाधिक वापर, आकाशवाणी सोलापूर पुणे विभागात तिसर्‍या स्थानी !

मारुती बावडे

अक्कलकोट, दि.२२ : आकाशवाणी ॲप वापरण्यात सोलापूर आकाशवाणी केंद्र पुणे विभागात तिसऱ्या स्थानावर आहे. यामुळे आकाशवाणी सोलापूरची लोकप्रियता
दिसून येत आहे.सध्याच्या डिजीटल युगातही आकाशवाणी माध्यम अव्वलस्थानी आहे हेच यावरून दिसून
येते.

प्रसारभारतीच्या ‘न्यूज ऑनएआयआर’ या ॲपचा रसिक श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.देशभरात या ॲपचा
सर्वाधिक वापर करणाऱ्या शहरांमध्ये पुणे प्रथम क्रमांकावर, बेंगळूरू दुसऱ्या क्रमांकावर आहे.तर आकाशवाणी सोलापूर केंद्र हे पुणे विभागात तिसऱ्या क्रमांकावर आहे,असे प्रसार भारतीने मे महिन्यात केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे.

आकाशवाणी सोलापूर केंद्राच्या या पुणे विभागातील गौरवपूर्ण स्थानाबद्दल आनंद आणि अभिमानाची भावना केंद्रप्रमुख सुनील शिनखेडे तसेच अभियांत्रिकी विभाग प्रमुख अर्चिता ढेरे यांनी व्यक्त केली आहे.आकाशवाणी सोलापूर परिवाराच्या सामूहिक प्रयत्नांना श्रोत्यांनी दिलेली ही सर्वोत्तम दाद आहे, असेही शिनखेडे यावेळी म्हणाले. कार्यक्रमातील नाविन्यपूर्णता,वैविध्य आणि दर्जा या निकषांवर पात्र ठरलेले आकाशवाणी सोलापूर केंद्राचे प्रसारण पुणे विभागात तिसऱ्या स्थानावर स्थानी पोचवण्यात रसिकश्रोते आणि
चाहत्यांचा वाटा मोठा आहे.सध्याच्या डिजीटल युगात प्रसार भारतीच्या ॲपचा
वापर वाढविण्यासाठी देखील सोलापूर केंद्राने भरघोस प्रयत्न केले.सोलापूर केंद्राचे कार्यक्रम ॲपद्वारे जिल्ह्यात,राज्यातच नव्हे तर देशात परदेशातही मोठ्या प्रमाणात ऐकले जातात. प्रत्यक्ष कार्यक्रमादरम्यान आणि नंतरही याबाबतचा फीडबॅक केंद्राला प्राप्त होत असतो. जगभरातील ९० पेक्षा अधिक देशांमध्ये हे ॲप ऐकले जाते, असे सर्वेक्षणात म्हटले आहे. आकाशवाणीच्या २४० पेक्षा अधिक रेडिओ सेवा ‘न्यूज ऑनएआयआर’ वरून थेट प्रसारित केले जातात. या वाहिन्या आणि सेवांपैकी विविध भारती ही वाहिनी जगात सर्वाधिक ऐकली जाते. न्यूज २४ बाय ७,एआयआर मल्याळम, एफएम गोल्ड दिल्ली,एफएम रेनबो दिल्ली या वाहिन्यांना जगभरात पसंती आहे.

प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शेखर यांनी या ॲपच्या उपयुक्ततेवर भर दिला असून दोनशेहून अधिक थेट प्रसारण सेवा देणारे आकाशवाणी हे जगातील एकमेव सरकारी माध्यम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. सोलापूर आकाशवाणीच्या या उत्तुंग कामगिरीबद्दल जिल्हावासीयांतून आकाशवाणीच्या टीमचे अभिनंदन केले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!