ध्यास विश्वसार्ह बातमीचा

लसीकरणाच्या बाबतीत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केली जिल्हाधिकार्‍यांकडे ‘ही’ मागणी

अक्कलकोट, दि.१३ : अक्कलकोट शहर आणि तालुक्यात सध्या कोरोना लसीची मोहीम सुरू आहे. परंतु बाहेरच्या व्यक्तींना जास्त लस मिळत असल्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणात लसीचा तुटवडा निर्माण होत आहे. त्या अनुषंगाने अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील गावांमध्ये बाहेरील नागरिकांना लस देऊ नये, अशा प्रकारची मागणी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी जिल्हाधिकारी
मिलिंद शंभरकर यांच्याकडे केली आहे.

वास्तविक पाहता अक्कलकोट तालुक्यातील नागरिकांना अक्कलकोट तालुक्यातील केंद्रावरच लसीकरण मिळणे गरजेचे आहे. परंतु केंद्र अक्कलकोटचे आणि लस घेणारे बाहेरचे अशी परिस्थिती निर्माण झाल्याने अनेक ठिकाणी तक्रारी येत आहेत. अक्कलकोट विधानसभेमध्ये तालुका व जिल्हा बाहेरील नागरिकांची लसीकरणाची नोंद मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना लसीकरण होत नाही
व नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्यामुळे
त्रास होत आहे. याबद्दल विनाकारण प्रशासनाबद्दल देखील असंतोष वाढत आहे. या कारणास्तव स्थानिक पातळीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून या विधानसभा क्षेत्रात जिल्हा बाहेरील व तालुका बाहेरील नागरिकांची नोंदणी अक्कलकोट विधानसभामधील गावांमध्ये होऊ नये, तशा प्रकारची पद्धत त्वरित
बंद करण्यात यावी,अशी मागणी आमदार कल्याणशेट्टी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

पूर्वी अक्कलकोट तालुक्यात लस घेणारे कमी आणि लसी जास्त होत्या.आता मात्र मृत्यु दर वाढल्याने लस हा एकच पर्याय कोरोनावरती आहे त्यामुळे प्रत्येक जण लसीकरण केंद्रावरती गर्दी करत आहे.
त्या अनुषंगाने लस देखील कमी पडत आहे अक्कलकोट तालुक्याला जास्तीत जास्त लस मिळावी आणि तालुका पूर्ण लसीकरण करण्याच्यादृष्टीने वरच्या पातळीवरती आपला पाठपुरावा सुरू आहे,असेही आमदार कल्याणशेट्टी यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!