तीर्थक्षेत्र अक्कलकोटमध्ये लवकरच इलेक्ट्रिक बस धावणार;चार्जिंग स्टेशनचा सर्व्हे पूर्ण, चार तासाच्या चार्जिंगला दोनशे किलोमीटर धावणार
मारुती बावडे
अक्कलकोट, दि.९ : अक्कलकोटमध्ये राज्य परिवहन महामंडळाकडून लवकरच इलेक्ट्रिक बस धावणार आहे स्वारगेट, शिवाजीनगर आणि ठाणे या ठिकाणी अशा बसेस सुरू झालेले आहेत.प्राथमिक स्तरावर चार्जिंग पॉइंटचा सर्व्हे पूर्ण झाला असून लवकरच त्याचे कामही लवकरच हाती घेतले जाणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
सध्या राज्य परिवहन महामंडळाचा इंधनावरचा खर्च हा खूप मोठा आहे त्यामुळे महामंडळ तोट्यात आहे या पार्श्वभूमीवर इंधन खर्चात बचत व्हावी आणि प्रदूषणाचे प्रमाण कमी
व्हावे,यासाठी राज्य परिवहन महामंडळाने अशा बसेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.सध्या प्रति किलोमीटर इंधनावरती २० ते २२ रुपये खर्च होत आहेत जर या इलेक्ट्रिक बस सुरू झाल्या तर प्रति किलोमीटर ६ ते ७ रुपये खर्च होईल,असा अंदाज आहे. साधारण ६० टक्के तरी इंधनावरचा खर्च कमी होईल,अशी माहिती मिळत आहे.एक बस चार्जिंग होण्यास किमान चार तास लागतील आणि एकदा चार्जिंग जर ही बस झाली तर दोनशे किलोमीटर ती धावेल.पहिल्या टप्प्यात पंढरपूर, मंगळवेढा,अक्कलकोट आणि सोलापूर या ठिकाणी या बसेस सुरू होणार आहेत.सध्या अक्कलकोट आगारामध्ये ६६ बसेस आहेत. यामध्ये चार शिवशाही दोन स्लीपर आणि एक स्लीपर सिटर अशा बस गाड्यांचा समावेश आहे या नवीन गाड्या एकदम येणार नाहीत पण टप्प्याटप्प्याने त्या येतील.पहिल्या टप्प्यामध्ये दोनशे किलोमीटरच्या आतल्या गावांना किंवा शहरांना त्या सोडल्या जातील असे नियोजन महामंडळाच्या पातळीवर सुरू झाले आहे.हा प्रयोग स्वारगेट,शिवाजीनगर आणि ठाणे
या ठिकाणी यशस्वी झाला असून त्याच धर्तीवर राज्यात अनेक ठिकाणी या बसेस सुरू करण्याचा निर्णय परिवहन महामंडळाने घेतला आहे.
निर्णयाची अंमलबजावणी
तातडीने व्हावी
काही दिवसांपूर्वी राज्य परिवहन महामंडळाने तिकीटासंदर्भात गुगल पे, फोन पे वापर करण्याचा निर्णय घेतला होता.कॅशलेशचा निर्णय ताजा असतानाच पुन्हा इलेक्ट्रिक बस सुरू करण्याच्या निर्णयाने महामंडळ अपडेट होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.पण या दोन्ही निर्णयाची अंमलबजावणी व्यापक स्वरूपात आणि तितक्याच जलद व्हावी,
अशी मागणी होत आहे.