ध्यास विश्वसार्ह बातमीचा

विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची आता रॅपिड अँटीजन टेस्ट होणार, गर्दी रोखण्यासाठी अक्कलकोट नगरपालिकेने घेतला निर्णय

 

अक्कलकोट, दि.२० : (मारुती बावडे ) अक्कलकोट शहरात यापुढे म्हणजे बुधवारपासून रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची रॅपिड अँटीजन टेस्ट करण्याचा निर्णय अक्कलकोट नगरपालिकेने घेतला आहे. वारंवार सांगूनही रस्त्यावर फिरणाऱ्याची गर्दी वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.याबाबतची माहिती मुख्याधिकारी सचिन पाटील यांनी दिली आहे.राज्य सरकारची जे निर्बंध आहेत त्या निर्बंधाचे पालन करावे असे आम्ही वारंवार सांगत आहोत त्या नियमांचे काहीजण पालन करत आहेत काहीजण विनाकारण रस्त्यावर फिरून गर्दी करत आहेत. काही काम नसताना चौकाचौकांमध्ये बसून गप्पा मारत आहेत.हे अत्यंत चुकीचे आहे. काही ठिकाणी शटर खाली करून दुकाने उघडे ठेवून चोरून मालाची विक्री केली जात आहे.या सर्व बाबी आमच्या निदर्शनास आल्या आहेत. त्यामुळे आम्ही तीन व्यापार्‍यावर कारवाई देखील केली आहे तसेच आता या पुढची मोहीम म्हणून जे लोक विनाकारण रस्त्यावर फिरतील त्यांना पकडून रॅपिड टेस्ट केले जाईल.जर ते पॉझिटिव आले तर त्यांना क्वारंटाईन केले जाईल,

असा इशारा मुख्याधिकारी पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांना आता चाप बसणार आहे. यासाठी फिरते रॅपिड अँटीजन टेस्ट पथक तैनात करण्यात येणार असून हे पथक विनाकारण रस्त्यावरून फिरणाऱ्यावर करडी नजर ठेवणार आहे.त्याशिवाय रस्त्यावरील गर्दी कमी होणार नाही, असेही त्यांनी नमूद केले. तसेच बुधवारपासून सकाळी ७ ते ११ या वेळेतच अत्यावश्यक सेवा सुरू असतील. यावेळेव्यतिरिक्त अन्य कोणतीही दुकाने सुरू राहणार नाहीत, याची नोंद सर्व व्यापाऱ्यांनी व दुकानदारांनी घ्यावी. जर यात एखाद्यानी नियम मोडण्याचा प्रयत्न केला तर मात्र शासनाच्या नियमाप्रमाणे कडक कारवाई करू, असेही पाटील यांनी सांगितले. यापुढे टेस्टिंग,ट्रेसिंग आणि लसीकरण ही त्रिसूत्री आम्ही प्रभावीपणे राबवणार आहोत. खास करून नियम मोडणार्‍याविरुद्ध आम्ही धडक कारवाई करण्याची मोहीम उघडली आहे.त्यासाठी वेगवेगळी पथक आम्ही तयार करत आहोत. त्यासाठी पोलिसांचीही मदत घेणार आहोत. अक्कलकोट शहरात नियम मोडणाऱ्याची यापुढे गय केली जाणार नाही,असेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!