तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट, दि.६ : कोरोनामुळे शासनाने आणि प्रशासनाने काही निर्बंध मंडळांवर लागू केले आहेत त्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करत सार्वजनिक गणेश मंडळाने यंदा देखील हा उत्सव साधेपणाने साजरा करावा आणि परंपरा जपावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी केले. अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशन येथे आज अक्कलकोट शहरातील सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी यांची बैठक घेण्यात आली.त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीत पोलीस निरीक्षक कुलकर्णी यांनी शासन व प्रशासन यांच्याकडून आलेल्या गणेश उत्सव साजरा करणे बाबतच्या मार्गदर्शक सूचना सांगून गणेश उत्सव हा साध्या पद्धतीने साजरा करावा. आगमनाची व विसर्जनाची मिरवणूक काढण्यात येऊ नये ,कोणत्याही सार्वजनिक रस्त्यावर अथवा ठिकाणावर मंडप ,पेंडॉल टाकण्यात येऊ नये असे सांगून कोरोनाच्या अनुषंगाने योग्य ती उपाययोजना करून नियमाचे व अटीचे तंतोतंत पालन करण्याबाबत सांगण्यात आले.यावेळी उपस्थित सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी यांनी गेल्या वर्षी ज्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला होता त्याच पद्धतीने साजरा करू ,असे आश्वासन दिले.यावेळी शरणप्पा कापसे, चेतन साखरे, योगेश पवार,सिद्धू माळी, प्रदीप सलबत्ते, अमीर पठाण, मल्लिनाथ पाटील,प्रथमेश पवार, वैभव मोरे, काशीनाथ कदम, सचिन जकापुरे अशा एकूण २८ गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.या बैठकीला पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी, गोपनीयचे अंमलदार धनराज शिंदे आणि गजानन शिंदे हेही उपस्थित होते.