तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट, दि.२० : अक्कलकोट तालुक्यातील दक्षिण भागातील अक्कलकोट स्टेशन ते हिळळी या १८ किलोमीटर रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे.
यामुळे रस्त्यावर वाहतूक करणे जिकरीचे झाले आहे.यासंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी ,खासदार डॉ.जय सिद्धेश्वर महास्वामी ,कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदन देण्यात आले आहे. हिळळी ,आंदेवाडी बुद्रुक आणि शावळ या तीन ग्रामपंचायतीने पुढाकार घेत हे निवेदन सादर केले आहे परंतु अद्याप त्याची दखल घेण्यात आली नाही. हा रस्ता मोठया लांबीचा असल्याने याची दुरुस्ती तात्काळ होणे गरजेचे आहे.सध्या या रस्त्यावरून जात असताना रुग्ण, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत.जागोजागी खड्डे पडल्याने गौडगाव, शावळ ,आंदेवाडी, हिळळी या गावा मार्गे कर्नाटक राज्याला जोडणारा रस्ता असल्याने सर्वांचे हाल होत आहेत. हा रस्ता देखील महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवर असल्याने दुर्लक्षित राहिला आहे.
या रस्त्याने इंडी, विजयपूरला देखील वाहतूक होत असते. पंतप्रधान ग्रामसडक योजना किंवा मुख्यमंत्री ग्राम सडक योजना या दोन्ही योजनेअंतर्गत रस्त्याचे काम
करावे ,अशी मागणी अनेक वर्षांपासून या गावातून होत आहे.महाराष्ट्रातील सीमावर्ती भागातील रस्ते दुरुस्त करून नागरिकांना दिलासा द्यावा, असे हिळळीचे सरपंच आप्पाशा शटगार यांनी सांगितले.अन्यथा तिन्ही गावाच्यावतीने आंदोलन करण्याचा करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.