तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट, दि.२० : गेल्या अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अक्कलकोट शहरातील बहुचर्चित प्रियदर्शनी मंगल कार्यालय अखेर खुले झाले असून त्याचा लोकार्पण सोहळा नगराध्यक्ष शोभा खेडगी यांच्या हस्ते सोमवारी पार पडला.
या मंगल कार्यालयाच्या नूतनीकरणावरती
एक कोटी रुपये खर्च झाला असून एक ऑक्टोबरपासून हे मंगल कार्यालय जनतेसाठी खुले होणार आहे.
प्रियदर्शनी मंगल कार्यालय ही एक मोठी वास्तू अक्कलकोट शहरामध्ये आहे .गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू होते .अखेर त्याचे काम पूर्ण झाल्याने आता नागरिकांसाठी हे कार्यालय विवाह समारंभ तसेच अन्य कार्यक्रमांसाठी उपयोगी पडणार आहे.
त्याचे बुकिंग देखील आजपासून सुरू करण्यात आले असून कार्यक्रम मात्र १ ऑक्टोबरपासून सुरू होतील,
अशी माहिती पालिकेचे विरोधी पक्षनेते अशपाक बळोरगी यांनी दिली.
सध्या याचे भाडे पंधरा हजार रुपये असून सर्वसामान्यांना हे परवडणारे आहे जरी इमारतीचे नूतनीकरण झालेले असते तरी याचे भाडे हेच कायम राहावे,
अशी इच्छा नागरिकांची आहे तसा प्रस्ताव आम्ही बोर्डात ठेवणार असल्याची माहिती पक्षनेते महेश हिंडोळे यांनी दिली. नूतनीकरणाच्या कामास थोडासा विलंब झालेला असला तरी काम चांगल्या दर्जाचे झाले आहे आता नागरिकांनी याचा लाभ घ्यावा ,असे आवाहन नगराध्यक्ष शोभा खेडगी यांनी यावेळी बोलताना केले.
अंतर्गत आणि बाहेरील दोन्ही बाजूने ही इमारत नीटनेटकी करून अद्ययावत लाईट फिटिंगसह सुशोभीकरण करण्यात आले आहे. यामुळे गोरगरीब जनतेला कमी खर्चात आपल्या मुलामुलींचे विवाह सोहळे अथवा अन्य कौटुंबिक कार्यक्रम आनंदाने साजरे करता येतील,असे बसलिंगप्पा खेडगी यांनी सांगितले.प्रारंभी फीत कापून नगराध्यक्ष शोभा खेडगी पक्षनेते अश्पाक बळोरगी,पक्षनेते महेश हिंडोळे,नगरसेवक बसलिंगप्पा खेडगी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी नगरसेवक सद्दाम शेरीकर ,जितेश यारोळे,चंदन आडवीतोटे,विकास मोरे,अशोक हरकूड जितेश यारोळे, विक्रम हर्डीकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.
काम पूर्ण
झाल्याचे समाधान
कार्यालय पूर्ववत सुरु व्हावे ही अक्कलकोटकरांची आग्रही मागणी होती ती पूर्ण करण्यासाठी आम्ही जिल्हा नगरोथान, वैशिष्ट्यपूर्ण योजनेच्या निधीतून ही इमारत सुसज्ज बनवली आहे. कांही तांत्रिक अडचणी उदभवल्यामुळे हे काम वेळेत पूर्ण न झाल्याची खंत असली तरी ते पूर्ण होऊन जनतेसाठी खुले झाले याचे समाधान आहे.
शोभा खेडगी,नगराध्यक्ष