हजारोंच्या उपस्थितीत पुण्यात रंगला अक्कलकोटकरांचा स्नेह मेळावा ; वेळअमावस्येनिमित्त बसवेश्वर मित्र मंडळाचा उपक्रम
अक्कलकोट, दि.९ : वेळाअमावस्येचे औचित्य साधून पुण्यात हजारो नागरिकांच्या उपस्थितीत स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला माजीमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी हजेरी लावून उपस्थितीतांचा आनंद द्विगुणित केला.
बसवेश्वर मित्र मंडळ पुणे यांच्यावतीने आयोजित या स्नेहभोजन कार्यक्रमास सोलापूरसह अक्कलकोट तालुक्यातील पुणे पिंपरी चिंचवड, हडपसर, राजंनगाव, कोथरूड, टिळेकर नगर, मार्केट यार्ड, वानवडी परिसरात रहिवासी असलेल्या नागरिकांनी आपल्या लहान मुलांसह तरूण व जेष्ठ नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली व मनसोक्त भोजनाचा आस्वाद घेतला. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष शिवशरण जोजन, महाराष्ट्र सरपंच परिषदेच्या जिल्हा समन्वयक वनिता सुरवसे, अॅड कोतमिरे, उद्योजक मधुकर सुरवसे, जिल्हा घडामोडीचे प्रमुख विवेक शेकापूरे, धोंडप्पा नंदे यांच्यासह विविध मान्यवरांनी भेट दिली व स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.
यावेळी बोलताना माजी मंत्री म्हेत्रे म्हणाले, आयोजकांचा उद्देश खूप चांगला आहे यानिमित्त सर्व जण असेच गोडीने मिळुन मिसळून राहुन प्रत्येकाच्या संकटात धावुन जावे. अडचण पडल्यास मीही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. सर्वांनी असेच एकजुटीने राहावे आणि आपल्या तालुक्याचा लौकिक वाढवावा, यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी जोजन व अॅड कोतमिरे यांनी आयोजकांचा शाल, फेटा श्रीफळ देऊन सत्कार करून कौतुक केले. स्नेहभोजन कार्यक्रमात वेळ अमावस्या निमित्ताने बनवले जाणारे सर्व पदार्थ भजी, खीर, चटणी, आंबील, ज्वारी बाजरीच्या कडक भाकरी, चपाती, वेगवेगळ्या भाज्यांचा समावेश होता.
बसवेश्वर मित्र मंडळाचे लक्ष्मण धोडमनी, शरणया स्वामी, पंडित जकापुरे, अप्पू पुजारी, शरणप्पा हुलबुठे, शिवा मेळकुंदे, नीलकंठ हिळळी, विक्रम मंठाळे, राजु दुर्गे, लक्ष्मण माने, राजू झगगे, काशिनाथ प्रचंडे, शिवशरण माळगे, राजु प्रचंडे, योगीनाथ स्वामी, सैदप्पा खंडाळ,
हनुमंत अल्लापुरे, शिवराज चिडगुंपी, शिवराज सलगर यांनी स्नेहभोजन कार्यक्रमासाठी आपले आर्थिक योगदान दिले. या उपक्रमात ५ ते सहा हजार नागरिकांनी भोजनाचा आस्वाद घेतल्याची माहिती आयोजकांनी दिली.
दरवर्षी हा उपक्रम घेण्यात येतो. सर्व जण यानिमित्ताने सुट्टीच्या दिवशी एकत्र येतात. यंदा नागरिकांना चांगल्या प्रकारे आसन व्यवस्था व मोठा हाॅल उपलब्ध झाल्याने उपस्थितांची चांगली सोय झाली. सर्वांनी बसवेश्वर मित्र मंडळाच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल कौतुक केले.
अक्कलकोटकरांनी दाखविली पुण्यात एकी
कामानिमित्त सोलापूरसह अक्कलकोट तालुक्यातील हजारो लोक हे पुण्यात राहत असतात. ते दरवर्षी प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करून सर्वजण एकी दाखवतात. वेळाअमावस्येला ग्रामीण भागात खूप महत्व आहे. त्या दृष्टीने सर्वांनी विचार करून पुण्यात हा उपक्रम सुरू केला आहे.