वागदरी जिल्हा परिषद गटात रस्त्यांसाठी १ कोटी ११ लाखांचा निधी मंजूर,आनंद तानवडे यांच्या प्रयत्नाला यश
तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट, दि.२ : वागदरी जिल्हा परिषद मतदारसंघात विविध रस्त्यांच्या विकास कामासाठी १ कोटी ११ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे यांनी दिली.सदर गावाकरिता देश स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्याच वेळी इतका निधी मंजूर झाला आहे.जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्र.१ डीपीडिसी सन २०२० -२०२१ प्रमाणे हे ग्रामीण
रस्ते वागदरी जि.प गटात मंजूर झाले आहेत.यात बनजगोळ ते शिरवळ ३२ लाख ,शिरवळ ते साफळे १५ लाख ,
खैराट ते वरनाळ २२लाख,बोरगाव दे ते चुंगी १५ लाख , शिरवळ ते बनजगोळ १५ लाख ,घोळसगाव ते पालापूर १२.५० लाख असे कामे मी शिफारस केल्याप्रमाणे मंजूर झाले आहे.या कामाची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. एकूण निधी १ कोटी ११ लाख ५० हजारचा आहे.यात या रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरण होणार आहे.बनजगोळ ते शिरवळ या एकूण ७ किलोमीटर रस्त्यापैकी ५ किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.या कामासाठी माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्घ कांबळे,अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे यांचे सहकार्य मिळाले,असे तानवडे यांनी सांगितले.