मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सर्वोच्च न्यायालयाकडूनही त्यांना दिलासा मिळालेला नाही. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सीबीआयचा एफआयआर रद्द करण्यास नकार देणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी अनिल देशमुख यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. तर, अटकेची टांगती तलवार अनिल देशमुखांवर कायम आहे.
अनिल देशमुख यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आत्तापर्यंत ईडीनं ५ वेळा समन्स बजावले आहेत. पाचवं समन्स मंगळवारी १७ ऑगस्ट रोजी बजावलं होतं. आज त्यांना ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र, आज देखील अनिल देशमुख चौकशीसाठी ED समोर हजर झालेले नाहीत.
अनिल देशमुखांना ईडीसमोर हजर राहता येणार नसल्याचा अर्ज दाखल करण्यासाठी त्यांचे वकिल इंदरपाल सिंग ईडीच्या कार्यालयात आले होते, त्यावेळी त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.