सीमाभागातील मराठी भाषिकांना पाठिंब्याचा ठराव एकमताने मंजूर करुन कर्नाटकाच्या आगळीकीला ‘जशास तसे’ उत्तर द्या – अजित पवार
नागपूर, दि. २६ डिसेंबर – महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारकडून सातत्याने अन्याय होत आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री जाणीवपूर्वक महाराष्ट्रविरोधी वक्तव्ये करुन महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला डिवचत आहेत. कर्नाटकच्या विधीमंडळात सीमाभागासंदर्भातील ठराव मंजूर करताना महाराष्ट्राच्या अभिमान, स्वाभिमान, अस्मितेला धक्का लावण्याचे काम झाले आहे. कर्नाटकच्या या आगळीकीला ‘जशास तसे’ उत्तर द्या अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केली.
सीमाभागातील मराठी जनतेच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र भक्कमपणे उभा आहे, हा विश्वास देण्यासाठी सीमाभागातील मराठी माणसांच्या लढ्याला संपूर्ण पाठींबा देणारा ठराव आजच सभागृहात एकमताने मंजूर करावा. सीमाप्रश्नी महाराष्ट्र एकजूट आहे. हा संदेश यानिमित्ताने सर्वांपर्यंत पोहोचू द्या असे आवाहनही विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज सभागृहात केले.
विधानसभेचे कामकाज सुरु होताच प्रश्नोत्तराच्या तासाआधी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सीभागातील मराठी माणसांवरील अन्याय आणि कर्नाटक सरकारने त्यांच्या विधीमंडळात मंजूर केलेल्या ठरावाचा मुद्दा उपस्थित केला. कर्नाटक सरकारच्या आगळीकीला महाराष्ट्राने ‘जशास तसे’ उत्तर देण्याची मागणी केली.
नागपूरचे हिवाळी अधिवेशन सुरु होण्याआधीपासून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याची महाराष्ट्राबाबत वादग्रस्त वक्तव्ये सुरु आहेत. केंद्रीय गृहमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतरही कर्नाटकच्या विधीमंडळात महाराष्ट्रविरोधी ठराव मंजूर करण्यात आला. महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटकात प्रवेशबंदी करण्यात आली, सीमेवर अटक करण्यात आली. तरीही महाराष्ट्र सरकार गप्प बसले आहे. सीमाभागातील मराठी माणसांना तिथे बाजू मांडता येत नसल्याने ते आज कोल्हापूरला येऊन त्यांची बाजू मांडणार आहेत. सीमाभागातील मराठी माणसांवरील कर्नाटकच्या अन्यायाविरुद्ध महाराष्ट्र विधानसभेत एकमताने ठराव मंजूर करण्यात यावा अशी मागणीही अजित पवार यांनी विधानसभेत केली.